रामनवमी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ केवळ डाव्या विचारसरणीला वाहिलेले नसून सर्व विचारसरणींचा आणि तत्वज्ञानांचा सन्मान करणारे आहे, असे स्पष्टीकरण विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने दिले आहे. रामनवमीदिवशी विद्यापीठात शाकाहाराच्या प्रश्नावरुन हिंसाचार उफाळला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटना यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने आपली भूमिका बुधवारी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केली.
रामनवमीच्या दिवशी घडलेला प्रकार दुर्दैवी होता, असे वक्तव्य विद्यापीठाच्या उपकुलगुरु शांतीश्री पंडित यांनी केले. विद्यापीठाच्या परिसरात सर्व प्रकारच्या उत्सव आणि सणांना अनुमती आहे. एकमेकांचा सन्मान राखून हे उत्सव विद्यार्थ्यांनी साजरे करावेत अशी विद्यापीठाची अपेक्षा आहे. मात्र कोणी हेतुपुरस्सर गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल. विद्यापीठाचे धोरण केवळ डाव्या विचारसरणीला प्रोत्साहन देणारे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
बहुविधतेवर विश्वास
विद्यापीठाचे धोरण बहुविधतेला अनुकूल आहे. सांस्कृतिक वैविध्य हे भारताचे वैशिष्टय़ आहे. परिणामी, विद्यापीठ परिसरातही या विविधतेतून एकतेचे प्रदर्शन व्हावे अशी आमची इच्छा आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे धोरण समजून घेऊन कार्य करावे असा आमचा त्यांना सल्ला आहे, असे पंडित यांनी प्रतिपादन केले.









