मुख्यमंत्रिपदावरून हटविल्याने होते नाराज : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक
वृत्तसंस्था/रांची
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या संस्थापकांपैकी एक चंपाई सोरेन यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रांची येथील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी यांच्या उपस्थितीत सोरेन यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यात आल्याने नाराज होत चंपाई सोरेन यांनी काही दिवसांपूर्वी झामुमोला रामराम ठोकला होता. चंपाई सोरेन हे झारखंडच्या कोल्हन भागातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. 60 वर्षीय आदिवासी नेता पक्षात सामील झाल्याने अनुसूचित जमातींमधील स्वत:चा प्रभाव वाढविण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. झारखंडमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर चंपाई सोरेन यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला आदिवासी समुदायाचा पठिंबा मिळविण्यास मदत होणार आहे. चंपाई सोरेन हे झामुमोचे सर्वेसर्वा शिबू सोरेन यांचे अत्यंत निकटवर्तीय राहिले आहेत. चंपाई सोरेन यांनी बुधवारी झामुमोला रामराम ठोकला होता. राज्य सरकारची वर्तमान कार्यशैली आणि धोरणांमुळे मला पक्ष सोडणे भाग पाडले आहे. झामुमोची मी अनेक वर्षांपर्यंत सेवा केली होती. तरीही माझ्यावर पक्षात अन्याय करण्यात आला. झारखंडच्या आदिवासी, दलित, मागास आणि सर्वसामान्य लोकांच्या मुद्द्यांकरता माझा संघर्ष कायम राहणार असल्याचे चंपाई सोरेन यांनी म्हटले होते.
कोल्हान टायगर
चंपाई सोरेन हे कोल्हान टायगर या नावाने देखील ओळखले जातात. झामुमोमध्ये ते शिबू सोरेन यांच्यानंतरच सर्वात वरिष्ठ आदिवासी नेते होते. हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यावर चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. परंतु हेमंत सोरेन यांना न्यायालयाकडून जामीन मिळाल्यावर चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनाम देण्यास भाग पाडले गेले होते. यामुळे चंपाई सोरेन हे नाराज झाले होते. कोल्हान क्षेत्रात चंपाई सोरेन यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांना कामगार नेता म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रातील 10 हजारांहून अधिक युवांना त्यांना औद्योगिक कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून दिला आहे. कोल्हानमधील 14 पैकी 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील निवडणुकीत झामुमोने यश मिळविले होते. या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात चंपाई सोरेन हे भाजपसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
संथाल समुदायाशी संबंधित
कोल्हान टायगर चंपाई सोरेन हे झारखंडमधील प्रभावशाली संथाल समुदायाशी संबंधित आहेत. चंपाई यांना संथाल समुदायाच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानले जाते. झारखंड राज्याच्या मागणीवरून झालेल्या आंदालेनात सक्रीय भूमिका बजावणारे चंपाई हे अन्य समुदायांमध्ये देखील प्रभावशाली मानले जातात.
आदीवासींचे अस्तित्व टिकविण्यासाठी…
झारखंडच्या संथाल भागात बांगला देशमधून घुसखोरी केलेल्या मुस्लीमांची संख्या वाढली आहे. यामुळे आदिवासींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. त्यांची अवैध धर्मांतरे होत आहेत. ही बाब स्पष्टपणे दिसून येत असूनही स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणारी सरकारे काहीही करत नाहीत. त्यामुळे आदिवासींची स्वतंत्र ओळख आणि अस्तित्व टिकविण्यासाठी मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे, असे प्रतिपादन चंपाई सोरेन यांनी दोन दिवसांपूर्वी केले आहे. त्याला अनुसरुन त्यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. चंपाई सोरेन यांच्या पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला या राज्यात लाभ होण्याची शक्यता आहे.









