समस्या सोडविण्यासाठी नियोजनाची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
जेएमएफसी न्यायालयाच्या आवारामध्ये पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे जेएमएफसी न्यायालयाचे प्रवेशद्वारच बंद करून वाहनांना बंदी करण्यात आली आहे. मात्र यामुळे अनेक दुचाकीस्वारांना इतरत्र पार्किंग करावे लागले. गुरुवारी न्यायालयाच्या आवारात वाहनांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे वकील, पक्षकार व इतर नागरिकदेखील चारचाकी वाहने आणत आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात पार्किंग करण्यास जागाच शिल्लक नसल्याचे दिसून आले.
गुरुवारी सकाळी 11.30 वाजता पार्किंग फुल्ल झाल्यामुळे रखवालदाराने जेएमएफसी न्यायालयाचे प्रवेशद्वारच बंद केले. यामुळे भरपावसात दुचाकीस्वारांना ताटकळत थांबावे लागले. कित्तूर चन्नम्मा ते आरटीओकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच काही वाहनांना ताटकळत थांबावे लागले. त्यामुळे त्याठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. गेल्या महिन्यापासून जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात पार्किंगची समस्या गंभीर बनत चालल्याचे दिसून येत आहे. चारचाकी आणि दुचाकी वाहने पार्किंग करण्यास जागाच नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. खुल्या जागेमध्ये इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे गुरुवारी प्रवेशद्वार बंद करावे लागले. पार्किंगची समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.









