वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सिमेंट क्षेत्रातील कंपनी जे के सिमेंटने रंग उत्पादन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने अलीकडेच ऍक्रो पेंटस्मध्ये 60 टक्के इतका वाटा हस्तगत करण्याचे ठरवले असून यायोगेच कंपनी आगामी काळात रंग उत्पादन व्यवसायाचा सर्वदूर विस्तार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऍक्रो पेंटस्चा राजस्थानमध्ये रंग व्यवसाय असून त्यातील 60 टक्के इतका वाटा जे के सिमेंटने खरेदी करण्याचे नियोजन केले असून या व्यवहारासाठी कंपनी 153 कोटी रुपये मोजणार असल्याचे सांगितले जाते. जे के सिमेंटची सहकारी कंपनी जे के पेंटस आणि कोटिंग लिमिटेडच्या माध्यमातून हा खरेदी करार होणार आहे. उर्वरीत 40 टक्के इतका वाटा पुढील 12 महिन्याच्या कालावधीत अधिग्रहीत केला जाणार असल्याचे जेके सिमेंटकडून सांगण्यात आले आहे. आगामी काळात अधिग्रहण पूर्ण झाल्यावर रंग उत्पादन क्षमता वाढीवर भर दिला जाणार आहे.
काय म्हणाले सीईओ
जे के सिमेंटचे सीईओ माधवकृष्णा सिंघानिया यांनी, आम्ही आगामी काळात रंग व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणार असून उत्पादन वाढीसोबत येणाऱया काळात जास्तीत जास्त शहरी बाजारांमध्ये व्यवसाय विस्ताराची आखणी करणार आहोत. सिमेंटसोबत रंग क्षेत्रातही अधिकाधिक विस्तारासाठी नेटाने प्रयत्न केले जाणार आहेत.









