कोल्हापूर / धीरज बरगे :
शहरालगत गतीने विस्तारलेले जीवबा नाना जाधव पार्क हे उपनगर सध्या प्राथमिक सुविधांच्या प्रतिक्षेत आहे. येथे नागरी वस्ती मोठ्याप्रमाणात वाढली असली तरी अद्याप पक्के रस्ते, गटार, रस्त्यांवरील लाईट अशा मूलभूत सुविधांचा अजूनही येथे आभाव आहे. यामुळे येथील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच मध्यरात्री होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे महिलांमधून संताप व्यक्त होत आहे. महापालिका, लोकप्रतिनिधी येथील नागरिकांना किमान मूलभूत सुविधा कधी पुरविणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
जिवबा नाना जाधव पार्क हे उपनगर सध्या अनेक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. येथे लोकवस्ती मोठयाप्रमाणात विस्तारली आहे, मात्र येथील नागरिकांना रस्ते, गटार, खांबांवर लाईट, पाणी अशा मूलभूत सुविधा पुरविण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरली आहे. हा प्रभाग क्रांतिसिंह नाना पाटील नगर आणि जीवबा नाना जाधव पार्क अशा दोन टप्प्यात विभागला आहे. यामध्ये जीवबा नाना जाधव पार्कचा भाग विकासापासून दूर्लक्षित राहिला आहे.

- अंतर्गत रस्त्यांवर अद्याप डांबर नाही
जीवबा नाना जाधव पार्क परिसरात मुख्य रस्ते झाले आहेत. पण अनेक कॉलन्यांमधील अंतर्गत रस्त्यांवर अद्याप डांबर पडलेले नाही. त्यामुळे नागरिकांना खडकाळ रस्त्यांमधूनच ये–जा करावे लागत आहे. तसेच पावसाळ्यात तर येथील रस्ते पूर्णपणे चिखलमय बनतात. परिणामी नागरिकांना या रस्त्यांवरुन चालत जाणे देखिल मुश्कील होत आहे. गैरसुविधांमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
- गटार नसल्याने सांडपणी साचून दूर्गंधी
येथील बहुतांश कॉलन्यांमध्ये पक्क्या गटारी नसल्याने उघड्यावरच सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी साचून राहून दूर्गंधी पसरत आहे. तसेच काही ठिकाणी गटार झाली आहे, पण गटारीमधून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने पाणी साचून राहत आहे. याचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
- रस्त्यावर लाईट नाही, सापांची भीती
जीवबा नाना जाधव पार्क लगत कळंबा ग्रामपंचायतीची हद्द आहे. यामध्ये मोकळा माळ व शेती आहे. या दोन्ही हद्दींच्या मधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अजूनही विद्युत दिवे नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर पूर्णपणे अंधाराचे साम्राज्य असते. शेती, माळरान यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वरचेवर असतोच. यामुळे विशेषत: रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना रस्त्यावर लाईट नसल्याने अंधारासह सापांची भीती येथील नागरिकांमध्ये असते. त्यामुळे रस्त्यावर विद्युत दिवे बसविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
- पाण्यासाठी महिलांचे जागते रहो..
परिसरात मध्यरात्री दोन वाजता पाणी पुरवठा होतो. पाणीपुरवठाही कमी दाबाने होतो. मध्यरात्री पाणी पुरवठा होत असल्याने महिलांची जागते रहो अशी स्थिती झाली आहे. कमी दाबाने व अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे विशेषत: महिलांमध्ये प्रचंड संताप आहे.
- समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील
जीवबा नाना जाधव पार्क परिसरात झपाट्याने नागरीवस्तीचा विस्तार होत आहे. मात्र येथील नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पक्के रस्ते, गटारी नसणे, कोंडाळे, विद्युत दिव्यांचा अभाव अशा अनेक समस्यांशी सामना करावा लागता आहे. भविष्यात या समस्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– अमृत सुतार, सामाजिक कार्यकर्ते.








