बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) बेळगावच्यावतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शुक्रवार दि. 15 ऑगस्ट रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8.30 ते दुपारी 3 या वेळेत महावीर भवन, हिंदवाडी येथे शिबिर होणार आहे. यावेळी केएलई, बिम्स, महावीर व बेळगाव रक्तपेढीच्यावतीने रक्त संकलन केले जाणार असल्याची माहिती जितोचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सामाजिक हेतूने जितोकडून मागील चार वर्षात पाच वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा व औषध प्रशासन विभागाच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. मागील वर्षी झालेल्या शिबिरामध्ये 836 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यांनी केलेल्या रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळाले आहे. जितोकडून राबविल्या जात असलेल्या सामाजिक उपक्रमामध्ये हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. एक युनिट रक्तामुळे तिघांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
रक्तदात्यांना न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीकडून एक वर्षाकरिता एक लाखाचा वैयक्तिक अपघात विमा मिळणार आहे. मागील 15 वर्षांपासून बेळगावमध्ये जितोच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. जितोकडून वर्षभर गरजूंना रक्तदानातील कार्डचे वितरण करून मदत केली जात असल्याचे विक्रम जैन यांनी सांगितले. यावेळी अभय आदिमनी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.









