प्रतिनिधी/ बेळगाव
जितो लेडिज विंग बेळगावतर्फे कर्नाटक, केरळ व गोवा विभाग पातळीवर आजादी का अमृतमहोत्सवनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सकाळच्या सत्रात बेंगळूरच्या अॅड. मोनिका पिरगल यांनी ‘महिलांच्या जीवनात स्वावलंबनाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच वारसा कायद्याने महिलांना कोणते अधिकार आहेत? याची माहिती दिली. उपस्थितांचे स्वागत जितोच्या अध्यक्षा शोभा दोड्डाणावर यांनी केले.
दुसऱ्या सत्रात ‘उन्नती की ओर बढता भारत’ या विषयावर भाषण स्पर्धा झाली. यामध्ये बेळगावच्या शालिनी चौगुले यांनी प्रथम व निर्मला कळ्ळीमनी यांनी द्वितीय क्रमांक तर बेंगळूरच्या निखिला मेहता यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. गायन स्पर्धेत प्रियंका ज्युटिंग बेळगाव यांनी प्रथम व हुबळीच्या मोक्षा जैन व समीक्षा पोरवाल यांना विभागून द्वितीय आणि हर्षिता ओसवाल यांना तृतीय क्रमांक देण्यात आला. के. के. जी. झोनच्या समन्वयक रेश्मा जैन व माजी समन्वयक भारती हरदी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अर्चना पद्मण्णावर, कार्यवाह रोशन खोडा, वैशाली उपाध्ये व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तृप्ती मांगले यांनी केले.
यावेळी के. के. जी. झोनचे चेअरमन अशोक सालेचा, बेळगाव जितोचे अध्यक्ष मुकेश जैन, जितो युवा विंगचे रजत हरदी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.









