ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यात सध्या तोडफोडीचे राजकारण सुरू आहे. आमदार म्हणजे खरेदी-विक्री संघातला कांदा-बटाटय़ाचा भाव नाही. मात्र, सध्याची सर्व परिस्थिती अवघड आहे. संविधानाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केला.
अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांबद्दल बोलताना आव्हाड म्हणाले, ऊन, पावसात घाम गाळून शरद पवारांनी राष्ट्रवादी हा पक्ष उभा केला. या पक्षाच्या माध्यमातून ज्या बापाने तुम्हाला उभं केलं. त्या बापालाच तुम्ही दु:ख देता. उलट शरद पवार हेच आमचे दैवत असल्याचं सांगता. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की, निवडून आलेला आमदार आणि पक्ष हे नातं आई आणि मुलासारखं आहे. पक्ष आई-बाप असेल तर व्हिप नाळ आहे. ही नाळ तोडता येत नाही. तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर पडा. पण तुम्हाला मर्जरशिवाय पर्याय नाही. तुम्हाला कोणत्यातरी पक्षात प्रवेश करावाच लागेल.
अजित पवार, भुजबळांना शरद पवारांनी काय कमी केलं होतं. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांना त्रास देता. कालपर्यंत तुम्ही ज्यांना शिव्या घालत होते, आज त्यांच्याच पाया पडता? कशासाठी? पण एक खरं आहे की, सर्व नद्या समुद्राला मिळतात पण समुद्र कधीही समुद्राला मिळत नाही, असं म्हणत अजित पवारांवर जोरदार टीका केली.








