दिल्लीतील अमित शहांच्या भेटीनंतर घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (एचएएम) संरक्षक आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या या बैठकीत जीतनराम मांझी यांचे पुत्र आणि ‘हम’चे प्रमुख संतोष सुमनही सहभागी झाले होते. या बैठकीनंतर संतोष सुमन यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होण्याची घोषणा केली.
‘हम’चे संरक्षक जीतनराम मांझी यांनी 19 जून रोजी बिहारच्या सत्ताधारी महाआघाडीपासून फारकत घेतली होती. त्यानंतर सर्व पर्यायांचा विचार करून त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने बुधवारी भाजप ज्येष्ठ नेते अमित शहांसोबत झालेल्या चर्चेअंती पक्षाने रालोआमध्ये सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याप्रसंगी बिहार भाजपचे ज्येष्ठ नेते नित्यानंद राय हेही अमित शाह यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. संतोष सुमन यांच्यासोबत ते दिल्लीत आले होते. मांझी पिता-पुत्र दोन दिवसांपासून दिल्लीत होते. अमित शहा यांच्या भेटीसाठी दोघेही आग्रही होते. त्यानुसार बुधवारी त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या पक्षांतर्गत चर्चेसंबंधी कोणीही सविस्तर भाष्य केलेले नाही.









