वृत्तसंस्था/ गया
बिहारमध्ये केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांच्या नातीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मृत महिलेचे नाव सुषमा देवी असे आहे. सुषमा देवी यांचे पती रमेश यांच्यावर हत्येचा आरोप आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपी पतीचा शोध घेतला जात आहे. हत्येची ही घटना अटारी ब्लॉकमधील तेतुआ गावात घडली. सुषमा अटारी ब्लॉकमध्ये विकास मित्र म्हणून काम करायची. तर तिचा पती आणि संशयित आरोपी रमेश हा ट्रकचालक म्हणून काम करत होता. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी पतीने घरात पत्नीवर गोळी झाडली आणि देशी बनावटीची पिस्तूल फेकून देऊन पळून गेला. सुषमा देवी आणि रमेश या दोघांनीही 14 वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता.









