रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानींची घोषणा
वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी घोषणा केली की समूहातील टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचा आयपीओ 2026 च्या पहिल्या सहामाहीत लाँच केला जाईल. ‘टेलिकॉम आणि डिजिटल रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म 2026 च्या पहिल्या सहामाहीत आयपीओ लाँच करण्यासाठी अर्ज करतील. हे नियामक मंजुरीच्या अधीन असेल,’ असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले.
जिओने ओलांडला 50 कोटी वापरकर्त्यांचा टप्पा
याचदरम्यान दूरसंचार क्षेत्रातील रिलायन्स जिओने 50 कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी कंपनीच्या 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (एजीएम) संबोधित करताना कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ही माहिती दिली. जिओच्या आर्थिक वर्ष 25 च्या वार्षिक अहवालानुसार, त्यावेळी कंपनीची ग्राहक संख्या 48.8 कोटी होती. त्यापैकी 19.1 कोटी वापरकर्ते त्यांच्या 5जी नेटवर्क सेवांशी जोडलेले होते. मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, 2026 च्या पहिल्या सहामाहीत रिलायन्स जिओ भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध होईल. अंबानी म्हणाले, ‘मी तुम्हाला खात्री देतो की हे सिद्ध करेल की जिओ त्याच्या जागतिक स्पर्धकांप्रमाणेच मोठ्या प्रमाणात मूल्य निर्माण करण्यास सक्षम आहे.
रिलायन्स रिटेलने मिळवला 3 लाख कोटीचा महसूल
याचदरम्यान समूहातील रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वर्षाच्या आधारावर 8 टक्के वाढीसह 3,30,943 कोटी रुपयांचा एकूण महसूल प्राप्त केल्याची माहिती कार्यकारी संचालक इशा अंबानी यांनी बैठकीत दिली.









