केंद्र सरकारची कमाई एकंदर 1.50 लाख कोटीच्या वर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताच्या दूरसंचार क्षेत्रात अमूलाग्र परिवर्तन घडविण्याची क्षमता असणाऱया 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमूहाच्या ‘जिओ’ने सर्वाधिक बोली बाजी मारली आहे. त्याखालोखाल भारतीय एअरटेलचा क्रमांक आहे. एक आठवडाभर चाललेल्या या लिलाव प्रक्रियेतून केंद्र सरकारने एकंदर 1 लाख 50 हजार 173 कोटी रुपयांची कमाई केली. गेल्यावर्षी झालेल्या 4 जी स्पेक्ट्रमच्या लिलावाच्या दुपटीहून अधिक ही रक्कम आहे. 5 जी स्पेक्ट्रमची क्षमता 4 जी पेक्षा 10 पट अधिक आहे.
या लिलावात कोणत्या कंपनीला किती स्पेक्ट्रम मिळाला हे सविस्तर वृत्तांत हाती आल्यानंतर समजणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, दूरसंचार क्षेत्रात प्रथमच प्रवेश करणाऱया अदानी उद्योगसमूहानेही बोली प्रक्रियेत भाग घेतला होता. या समूहाने 26 मेगाहर्टझ् स्पेक्ट्रमची प्राप्ती केली असल्याचे वृत्त आहे.
भारतव्यापी जाळे उभारणार
या लिलावात प्रथम क्रमांकावर राहिलेला रिलायन्स उद्योगसमूह आणि दुसऱया क्रमांकावरील भारती एअरटेलने 5 जी सेवा पुरविण्यासाठी भारतव्यापी जाळे उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर तिसऱया क्रमांकावर असणाऱया व्होडाफोनने देशाच्या निवडक भागांमध्ये ही सेवा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
5 जी बँडस् सर्वाधिक लोकप्रिय
सरकारने या लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून 10 बँडस् विक्रीसाठी खुले केले होते. तथापि, 600, 800 आणि 2300 मेगाहर्टझ् बँड करीता कोणीही बोली लावली नव्हती. बोली लागलेल्या बँडस्पैकी दोन तृतियांश बँडस् 5 जी स्पेक्ट्रमच्या 3,300 मेगाहर्टझ् आणि 26 गीगाहर्टझ् क्षेत्रातील होते. तर साधारणतः एक चतुर्थांश बँडस् हे 700 मेगाहर्टझ् क्षेत्रातील असून ते मागच्या दोन (2016 आणि 2021) लिलावांमध्ये विकले गेले नव्हते, अशी महिती देण्यात आली.
विक्रमी विक्री
यंदाच्या लिलावात झालेल्या स्पेक्ट्रम विक्रीने आतापर्यंतचे विक्रम तोडले गेले आहेत. गेल्या वर्षीचा लिलाव केवळ दोन दिवसांमध्ये आटोपला होता. त्यात रिलायन्सने 57,122 कोटी तर भारती एअरटेलने 18,699 कोटी रुपये किमतीचा स्पेक्ट्रम मिळविला होता. यावेळी ही रक्कम जवळपास दुप्पट आहे. व्होडाफोननेही गेल्यावेळेपेक्षा जास्त स्पेक्ट्रम खरेदी केला आहे.
72 गीगाहर्टझ् उपलब्ध
यंदाच्या वर्षी लिलावासाठी एकंदर 72 गीगाहर्टझ् स्पेक्ट्रम उपलब्ध करण्यात आला होता. त्याची एकंदर किंमत 4.30 लाख कोटी इतकी आहे. त्यापैकी या लिलावात 1 लाख 50 हजार कोटीहून अधिक रुपयांची स्पेक्ट्रमची विक्री झाली. पुढच्या टप्प्यांमध्ये आणखी स्पेक्ट्रमची विक्री केली जाणार आहे.
अनेक दृष्टींनी लाभदायक
5 जी स्पेक्ट्रम ग्राहकांसाठी अनेक दृष्टींनी लाभदायक ठरणार आहे. यामुळे इंटरनेटचा वेग किमान 8 ते 10 पट वाढणार आहे. याशिवाय अतिशय कमी पातळीवरील बँडनाही हे तंत्रज्ञान उपयोगी पडणार आहे. ई आरोग्य, ईकृषी, वाहन चालविणे, स्पष्टता आणि आवाजाची स्वच्छता आदी संबंधांमध्ये याचा उपयोग आहे. या स्पेक्ट्रममुळे दूरसंचार क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे.









