वृत्तसंस्था /मुंबई
भारतातील सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर रिलायन्स जिओ या वर्षाच्या अखेरीस संपूर्ण भारतात 5जी मोबाइल ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात कंपनी आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. वृत्तानुसार, नेटवर्क विस्तारासाठी जिओ नोकियाच्या 5जी उपकरणांमध्ये 14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. नुकताच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, रिलायन्स जिओ इन्फोकॉम 5जी नेटवर्क उपकरणे खरेदी करण्यासाठी फिनलँड-आधारित दूरसंचार कंपनी नोकियासोबत सुमारे 1.7 अब्ज डॉलर (14,000 कोटी रुपये) किमतीच्या कराराला अंतिम रूप देण्याच्या मार्गावर आहे. नोकियाच्या मुख्यालयात हा करार निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये 6 जुलै रोजी हेलसिंकीजवळ नोकियाच्या मुख्यालयात करारावर स्वाक्षरी करण्यात येणार होती. अहवालानुसार, रिलायन्स समूहाचे वरिष्ठ अधिकारी आणि या करारासाठी निधी देणाऱ्या बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. नोकियाकडून रिलायन्स ही 2.1 अब्ज डॉलर किमतीची 5जी उपकरणे स्वीडनच्या अॅरिकस्नकडून आधीच खरेदी करत आहे. अहवालात म्हटले आहे की ही खरेदी जिओच्या व्यवस्थेचा एक भाग आहे. कारण कंपनीने या वर्षाच्या अखेरीस देशभरात 5जी सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे.
करारासाठी पैसे कुठून येणार?
एचएसबीसी, जेपी मॉर्गन आणि सिटीग्रुप सारख्या जागतिक बँका अशा अनेक बँकांपैकी आहेत ज्या नोकिया आणि अॅरिकस्नची 5जी उपकरणे खरेदी करण्यासाठी जिओला पैसे देतील. एका अहवालात असे म्हटले आहे की एकूण कर्ज सुमारे 4 अब्ज डॉलरचे आहे.