वृत्तसंस्था / सिकंदराबाद
शुक्रवारी येथे झालेल्या हॉकी इंडियाच्या 14 व्या उपकनिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद झारखंडने पटकाविले. झारखंडने अंतिम सामन्यात मध्यप्रदेशचा निसटता पराभव केला.
मध्यप्रदेश आणि झारखंड यांच्यातील हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यातील एकमेव निर्णायक गोल झारखंडच्या लिओनीने 15 व्या मिनिटाला नोंदविला. या स्पर्धेतील लिओनीचा हा सातवा गोल आहे. या संपूर्ण स्पर्धेत झारखंडच्या उपकनिष्ठ महिला संघाने शेवटपर्यंत एकही सामना न गमविताना अजिंक्यपद हस्तगत केले आहे. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात ओडीशाने मिझोरामचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी विजेत्या झारखंड संघाला 3 लाख रुपयांचे तर उपविजेत्या मध्यप्रदेश संघाला 2 लाख रुपयांचे आणि ओडीशाला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.









