वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आसाममधील जोरहाट येथे झालेल्या उपकनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियन स्पर्धेचे अजिंक्यपद झारखंडने पटकाविताना अंतिम सामन्यात मणिपूरचा 3-2 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला.
झारखंड आणि मणिपूर यांच्यातील हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर दिला होता. पण दोन्ही संघांच्या भक्कम बचावफळीमुळे मध्यंतरापर्यंतच्या पहिल्या सत्रात गोलफलक कोराच राहिला. झारखंडच्या वेकहोम चानुने 46 व्या मिनीटाला नजरचुकीने चेंडू आपल्याच गोलपोस्टमध्ये मारल्याने मणिपूरला हा बोनस गोल मिळाला. 56 व्या मिनिटाला अनामिका कुमारीने झारखंडचा दुसरा गोल केला. 59 व्या मिनिटाला नेन्सी मुंडाने फ्रि कीकवर झारखंडचा तिसरा गोल नोंदविला. 84 व्या मिनिटाला मणिपूरचा दुसरा गोल नोंदविला गेला. शेवटच्या दोन मिनिटांच्या कालावधीत मणिपूरला बरोबरी करण्याची संधी मिळाली होती. पण झारखंडच्या गोलरक्षकांने मणिपूरचा हा फटका अडवून झारखंडला 3-2 अशा गोलफरकाने विजेतेपद मिळवून दिले. 2025 च्या सॅफ 17 वर्षाखालील वयोगटातील महिलांच्या फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचे जेतेपद भारतीय महिला फुटबॉल संघाने जिंकताना नेपाळचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारतीय फुटबॉल संघाने 3-0 अशी आघाडी नेपाळवर घेतली होती. या विजयामुळे भारताच्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या संघाने 5 सामन्यांतून 15 गुणांसह जेतेपद पटकावले. या स्पर्धेत बांगला देश दुसऱ्या स्थानावर राहिला.
…









