ऑनलाईन टीम/तरुण भारत
Jharkhand Political Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात सत्तानाट्य घडून महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर नितीश कुमार यांनी बिहारमध्ये सत्तांतर घडून आले. या दोन राज्यानंतर आता आणखी एका राज्यामध्ये सत्तासंकट ओढावलं आहे. आता झारखंडमध्ये सत्ता संघर्षाला वेग आला आहे. झारखंडमधील सत्ताधारी आमदारांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सत्ताधारी आघाडीच्या ४० आमदारांना घेऊन एक चार्टर्ड विमान रांची (ranchi) येथून रायपूरच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान, झारखंडमधील (Jharkhand Political crisis) सत्ताधारी पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) आणि काँग्रेसने त्यांच्या ४० आमदारांना विशेष विमानाने रायपूरला पोहोचवलं आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren Chief minister of Jharkhand) हे आमदारांना दोन बसमध्ये घेऊन विमानतळावर पोहोचवण्यास आले होते. मात्र मुख्यमंत्री रांचीमध्येच थांबणार आहेत.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना महागठबंधनमधील आमदारात फूट पडण्याची तसेच आमदार फोडले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीपासून धडा घेऊन झारखंडमधील महागठबंधनच्या सर्व आमदारांना काँग्रेस शासित छत्तीसगड राज्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
हे ही वाचा : गुलाम नबी काँग्रेसमधून ‘आझाद’; सोनिया गांधींना पत्र पाठवत राजीनामा
काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आमदारांना रायपूरच्या एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. या आमदारांची जबाबदारी कर्मकार मंडळाचे अध्यक्ष सन्नी अग्रवाल, राज्य खनिज विकास निगमचे अध्यक्ष गिरीश देवांगन आणि नागरिक आपूर्ती निगमचे अध्यक्ष राम गोपाल अग्रवाल यांना देण्यात आली आहे.
रांचीतून विशेष विमानाने रायपूरला आलेल्या आमदारांच्या सुरक्षेसाठी रिसॉर्टवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रिसॉर्टच्या आतमध्ये जाण्याची परवानगी कोणालाही नाही. तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्थेमध्ये तिसऱ्या लेयरमध्ये ASP स्तराचे अधिकारी, दुसऱ्या स्तरावर CSP यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
झारखंड विधानसभेची विद्यमान सदस्यसंख्या ८१ असून सत्ताधारी आघाडीचे संख्याबळ ४९ आहे. रांची विमानतळाबाहेर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले की, कोणतेही अघटीत घटना होऊ नये म्हणून खास रणनिती आखून आम्ही आमच्या आमदारांना रिसॉर्टवर ठेवले आहे. राज्यामध्ये षडयंत्र करणाऱ्यांना प्रत्युत्तर मिळेल. आम्ही आमचे आमदार दुसरीकडे नेत आहोत, यात आश्चर्य वाटावे असे काही नाही. राजकारणात असे घडतच असते. कोणत्याची स्थितीचा सामना करण्याची आमची तयारी आहे.









