कराड :
मुलीच्या बारशाचा कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमाच्या धावपळीचा फायदा घेत संशयितांनी महिलेच्या तीन तोळे दागिन्यांवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी प्रियांका रणजित शिंदे (वय 25, रा. सी-टाईप कॉलनी, सह्याद्री साखर कारखाना, यशवंतनगर) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चोरीप्रकरणी तपासणी सुरू केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तक्रारदार प्रियांका यांची मुलगी अवंतिका हिचा बारशाचा कार्यक्रम 10 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते 5 वाजण्याच्या दरम्यान सैदापूर येथील एका लॉन्समध्ये आयोजित होता. कार्यक्रमासाठी प्रियांका यांच्या सासूने दहा तोळे सोन्याचे दागिने आणले होते. मेकअपदरम्यान तीन तोळे सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवून पर्स हॉलमधील खोलीत टेबलावर ठेवण्यात आली.
दरम्यान, बाळ रडल्याने तक्रारदार खोलीतून ठिकाणाहून खाली गेल्या. काही वेळाने पर्स पाहिली असता ती जागेवरून गायब असल्याचे आढळले. नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला मात्र पर्स सापडली नाही. पर्समध्ये दोन तोळ्यांचा राणीहार, एक तोळे एक ग्रॅम वजनाचे नेकलेस आणि नथ असे तीन तोळ्यांचे दागिने होते. दागिन्यांची पर्स गायब झाल्यानंतर नातेवाईकांनी अनेक ठिकाणी शोधत घेत विचारपूस केली. मात्र दागिने सापडले नाहीत. सलग दोन दिवस त्यांनी दागिन्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र दागिने न सापडल्याने अखेर त्यांनी 12 ऑगस्ट रोजी कराड शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार तपास करत आहेत.








