खेड :
कोकण मार्गावर धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या 2 लाख 89 हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. 5 जुलै रोजी मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास येथील रेल्वेस्थानकात ही घटना घडली.
एक महिला 12620 क्रमांकाच्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या बोगी नं. 53 मधील 60 नंबरच्या आसनावरून रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करत होती. एक्स्प्रेस येथील रेल्वेस्थानकात आली असता चोरट्याने त्या झोपल्या असल्याची संधी साधत सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास केली. बॅगेतील दागिने व रक्कम काढून घेत बॅग रेल्वे डब्यातील टॉयलेटमध्ये फेकत पलायन केले.
सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरीस गेल्याचे महिलेच्या लक्षात येताच धक्का बसला. नंतर येथील पोलीस ठाणे गाठत रितसर तक्रार नोंदवली. कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने लंपास करण्याचे सत्र सुरूच असल्याने प्रवाशांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.








