राजापूर :
आषाढी एकादशी व मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त असतानाही शनिवारी दोन ठिकाणी सदनिका फोडण्यात आल्या. यातील लॅविश अपार्टमेंटमध्ये झालेल्या चोरीमध्ये सुमारे 13 लाखाच्या ऐवजाची चोरी झाली. तर पेट्रोल पंपासमोरच्या सिंधुरत्न अपार्टमेंटमधील एका सदनिकेत चोरीचा प्रयत्न केला असता तिथे चोरट्याच्या हाती काहीच लागले नाही. महिन्याभरातील राजापुरातील ही दुसरी घटना आहे.
याबाबत राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवडा बाजारात फळविक्री करणारे संतोष भाबुद्रे यांच्या मालकीची जकात नाकानजीक लॅविश अपार्टमेंटमध्ये सदनिका आहे. भाबुद्रे हे शनिवारी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरातील इतर सदस्य रानतळे येथे फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान भाबुद्रे घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा असून आतील कपाटामधील साहित्य विस्कटलेल्या स्थितीत आढळले. त्यानंतर भाबुद्रे यांनी राजापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. चोरट्याने कामासाठी ठेवलेले सुमारे 9 लाख रोख ऊपये व सुमारे 4 लाख ऊपयांच्या दागिन्यांची चोरी केली. दिवसाढवळ्या चोरी झाल्याने चोरटा माहितगार असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दुसऱ्या घटेनत शनिवारी शहरातील पेट्रोल पंपासमोरील सिंधुरत्न अपार्टमेंटच्या ए विंगमध्ये महाडिक यांच्या सदनिकेच्या दरवाजाची कडी तोडून प्रवेश करत चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्याच्या हाती काहीच लागले नाही. मात्र या दोन्ही सदनिका फोडल्याच्या घटनेने राजापुरात खळबळ उडाली असून नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.








