सांगली :
दागिने करण्यासाठी सराफाने सोने कारागिरास दिलेली ६६ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड घेऊन कारागीर पसार झाला आहे. याप्रकरणी आपली ५ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. संशयित सुमंगल गोपाल घोष (वय २८, रा. मध्यगुरगुरीया, जि. दक्षिण २४ परगणा, पश्चिम बंगाल) याच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजेंद्र आबासाहेब भगत (रा. श्रीराम अपार्टमेंट, रेल्वे पुलानजीक, चिंतामणीनगर, माधवनगर रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती अशी, फिर्यादी राजेंद्र भगत यांचे हरभट रस्त्यावरील केडगे कॉम्पलेक्स येथे तन्वी चेन या नावाचे दुकान आहे. दि. ३ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास भगत यांना एका ग्राहकाने सोन्याचे दागिने करण्यासाठी ६६ ग्रॅम वजनाचे लगड दिले. नेहमीप्रमाणे भगत यांनी त्यांच्या दुकानात कार्यरत असणाऱ्या संशयित सुमंगल घोष याला लगड देवून त्यास दागिने करण्यास सांगितले. परंतु घोष याने सदर लगड लंपास केल्याची बाब आबासाहेब भगत यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. सांगली पोलीस अधिक तपास करीत आहेत








