बेळगाव : बस्तवाड-हलगा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात चोरी झाली आहे. रविवार दि. 22 ऑक्टोबर रोजी पहाटे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे गावात खळबळ माजली आहे. गेल्या आठवड्यात दोन ठिकाणी नव्या बांधकामांवरील सेंट्रिंग प्लेट चोरल्याची घटना ताजी असतानाच आता चोरट्यांनी मंदिराला लक्ष्य बनविले आहे. धर्मवीर संभाजी गल्ली, बस्तवाड येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर व गाभाऱ्याचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला आहे. मंदिरातील चांदीचा किरीट व सोन्याचे मंगळसूत्र असे 50 हजार रुपयेहून अधिक किमतीचे देवाचे दागिने चोरट्यांनी पळविले आहेत. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हिरेबागेवाडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण केले. मंदिराशी संबंधितांनी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून बस्तवाड परिसरातील वाढत्या चोऱ्यांनी नागरिक हैराण झाले आहेत.
ट्रकच्या बॅटऱ्यांचीही चोरी
मंदिरातील चोरीपाठोपाठ कोंडुस्कोप क्रॉसवरील गोदामासमोर उभी करण्यात आलेल्या आयशर ट्रकमधील बॅटऱ्या चोरण्यात आल्या आहेत. जोतिबा नागू पाटील यांच्या ट्रकच्या बॅटऱ्या चोरण्यात आल्या असून या प्रकरणीही पोलिसात फिर्याद दिली आहे.









