नंदगड पोलिसांची कारवाई : कागदपत्राविना दागिन्यांची वाहतूक
खानापूर : कागदपत्राशिवाय घेऊन जाणारे 40 लाख 33 हजार 729 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने नंदगड पोलिसांनी जप्त केले. हे सर्व दागिने कागदपत्राविना वाहनातून घेऊन जात असल्याने पोलिसांनी कारवाई केली. कोणत्याही कागदपत्राशिवाय सोने-चांदीच्या दागिन्यांची अवैध वाहतूक करत असल्याची माहिती नंदगड पोलिसांना मिळाली होती. लिंगनमठ येथे धर्मराज हणमंत कुट्रे यांच्या (रा. हल्याळ, के. ए. 63, टी सी 0841) कारची तपासणी केली. त्यावेळी कारमध्ये 40 लाख 33 हजार 729 रुपयांचे दागिने आढळून आले. या दागिन्यांची कागदपत्राविना वाहतूक करण्यात येत होती. याबाबत नंदगड पोलिसांनी निवडणुकीच्या काळातील मार्गसूचीनुसार कारवाई करत मुद्देमालासह वाहन ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. ही कारवाई नंदगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक बसवराज बी. लमाणी, निरीक्षक तिरुपती राठोड, पोलीस कर्मचारी एन. बी. बेलवडी, यू. बी. शिंत्री आदींनी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









