उचगाव / वार्ताहर
उचगाव ता.करवीर पैकी मणेरमळा येथे माने पार्क यादव वाडी येथे तीन घरांची कडी कोयंडा कापून घरातील तिजोरीतून पाच तोळे सोने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख १७ हजार चा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला. तीन घरात धाडसी चोरी करत मणेर मळ्यात शुक्रवारी चोरट्यानी धुमाकूळ घातला. याबाबत गांधीनगर पोलिसांत विक्रम हिंदुराव पवार (वय ३४ रा. माने पार्क यादव वाडी उचगाव ता. करवीर ) यांनी फिर्याद दिली.
शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी विक्रम हिंदुराव पवार यांच्या राहत्या घराचा कडीकोयंडा कापून घरातील सोन्याचे गंठण, सोन्याच्या रिंगा तसेच रोख बारा हजार रुपये तसेच शेजारी असणारे तानाजी अण्णाप्पा तोडकर यांच्या घराचा कडी कोयंडा कापून लहान मुलांच्या अंगठ्या, चांदीचे दागिने असे एकूण दोन लाख १७ हजार चा मुद्देमाल लंपास केला.तर आणखी एका बंद घरात चोरीचा प्रयत्न करण्यात आला.
पाच दिवसांपूर्वी नामदेव बेलवळेकर यांच्या घरातून नऊ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. शुक्रवारी एका दिवसात तीन ठिकाणी चोरी करून चोरट्याने गांधीनगर पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे . या चोरींची नोंद गांधीनगर पोलिसात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले करीत आहेत.









