बास्केटबॉल कोर्टपेक्षा समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या एका लहानशा किनारी राज्यात, जेशुआ आंतोनियो दोश पिंटोने एक असा प्रवास रचला आहे जो प्रत्येकी क्रीडापटूसाठी प्रेरणादायी आहे. कळंगूटच्या अरूंद गल्लीपासून विश्व युनिव्हर्सिटी गेम्सपर्यंतचा त्याचा बास्केटबॉल खेळातील प्रवास निश्चितच थक्क करणारा आहे. सहा फूटची उंची, वेगवान आणि आक्रमक खेळ तसेच कोर्टवर प्रभावी उपस्थिती एका प्रोफेशनल बास्केटबॉल खेळाडूसाठी आवश्यक असलेले सर्व गुण या प्रतिभावंत खेळाडूकडे आहे.
त्याची चपळता, टायमिंग आणि अथक दृढनिश्चय या गुणांनी त्याला गोव्याच्या सर्वोत्तम बास्केटबॉल प्रतिभांपैकी एक म्हणून उदयास येण्यास मदत केली आहे. जर्मनीमध्ये होणाऱ्या विश्व विद्यापीठ गेम्स 2025 मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्याची अलिकडची निवड हा केवळ त्याचा वैयक्तिक टप्पा नसून, गोव्यासाठी हा एक मोठा अभिमानाचा क्षण आहे. यामुळे लहान राज्यांमधील खेळाडू योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास जागतिक क्रीडा व्यासपीठावर तेजस्वीपणे चमकू शकतात, हे परत एकदा सिद्ध झाले आहे.
जेशुआचा बास्केटबॉल खेळातील प्रवास कळंगूटमधील लुर्ड्स बास्केटबॉल क्लबमध्ये सुरू झाला, जो त्यावेळी गोव्याच्या बास्केटबॉल क्षेत्रात एक कमकुवत संघ मानला जात होता. सराव, मेहनद, जिद्द आणि चिकाटीने जेशुआ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी राज्यातील सर्वोत्तम संघांना आव्हान देण्यास सुरूवात केली. फातोर्डाच्या डॉन बॉस्को ओरेटरी, वायएमसीए नाईट्स, केजे, सोनिक्स या राज्यातील मातब्बर संघांचे वचर्स्व हळूहळू कमी होत गेले. जेशुआच्या नेतृत्वाखाली लुर्ड्स क्लब गोव्याचा प्रमुख बास्केटबॉल संघ बनला आणि सलग तीन वर्षे राज्य अजिंक्यपद जिंकले. त्याची ही कामगिरी त्याने कोर्ट्समध्ये आणलेल्या समन्वय आणि त्याच्या कल्पक नेतृत्वाची छाप दाखवून गेली.
जेशुआने साळगावच्या लुर्ड्स काँव्हेटमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पणजीच्या डॉन बॉस्कोमधून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. जेशुआने चेन्नईतील प्रसिद्ध लॉयोला कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केली. लॉयोला ही एक प्रतिष्ठित संस्था आहे, जी शैक्षणिक आणि स्पर्धात्मक खेळांमध्ये उत्तम संतुलन साधत आहे. तो आता राजस्थानमधील कोटा विद्यापीठात पदव्यूत्तर पदवी घेत असून शैक्षणिक आणि स्पर्धात्मक खेळांमध्ये उत्तम संतुलन साधत आहे.
कोटा विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करताना, जेशुआने अखिल भारतीय विद्यापीठ 3×3 बास्केटबॉल चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले. हे त्याचा वेगाने वाढणाऱ्या कामगिरीच्या यादीतील अनेक पुरस्कारांपैकी एक आहे. बास्केटबॉल खेळातील त्याचा आलेख सतत वाढल्याचा दिसत असून तो समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. जेशुआ खेलो इंडिया विद्यापीठ गेम्स 2023 मध्ये सुवर्णपदक विजेता होता. या सालात गोव्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्याने गोव्याचे प्रतिनिधीत्व केले होते. 2021 ते 2025 पर्यंत त्याने सीनियर राष्ट्रीय बॉस्केटबॉल स्पर्धा नियमित खेळली. 74व्या राष्ट्रीय सीनियर बास्केटबॉल स्पर्धेत गोव्याचे कप्तानपद भुषविलेल्या जेशुआने 2023 आणि 2024 मध्ये अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ अजिंक्यपद स्पर्धेतही भाग घेतला आणि दुसऱ्या अ. भा. शिवकुमार स्मृती बास्केटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले. 2024 मध्ये गोवा 3×3 बास्केटबॉल लीगचे जेतेपद आणि यंदा सीनियर 3×3 राष्ट्रीय स्पर्धेत त्याने केलेली कामगिरी त्याच्या विविध स्वरूपातील बहुमुखी प्रतिभा दर्शवते.
‘जेशुआकडे नेहमीच प्रचंड प्रतिभा आणि उत्साह होता, असे गोवा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष शेन डायस म्हणतात. ‘लोकांना नेहमीच पडद्यामागील त्याग दिसत नाहीत. पहाटे उठणे, प्रवास करणे, अभ्यास आणि खेळाचे संतुलन राखणे ही सोपी गोष्ट नाहीयं, असे शेन म्हणतात. जेशुआने बास्केटबॉल खेळाचा पाया लककर आणि पद्धतशीरपणे बांधला. 2012 मध्ये सब-ज्युनियर, 2016 व 2017 मध्ये यूथ नॅशनल आणि 2018 व 2019 मध्ये ज्युनियर नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेत त्याने गोव्याचे प्रतिनिधीत्व केले. ‘भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी जेशुआची झालेली निवड त्याच्या वर्षांच्या कठोर परिश्रम, सातत्य आणि विश्वासाचे बक्षीस आहे. मात्र, त्याचे हे यश त्याच्या डोक्यात गेलेले नाही. तो अजुनही जमिनीवरच आहे. तो एक अतिशय विनम्र मुलगा आहे. शांत, लक्ष केंद्रित करणारा आणि अत्यंत उत्साही, असे 37व्या राष्ट्रीय खेळांमध्ये गोव्याच्या चमूचे प्रमुख असलेले आणि गोवा बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष संदीप हेबळे म्हणाले.
‘जेशुआची कहाणी त्याची चिकाटी आणि कठोर परिश्रमाची आहे आणि तो गोव्यातील तरूण खेळाडूंसाठी एक आदर्श बनला आहे. बास्केटबॉल खेळात जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंची शासनाने दखल घेतली पहिजे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी नोकरीत केंद्रित धोरण असले पाहिजे, कारण या पातळीवर पोहोचण्यासाठी वर्षांनुवर्षे समपर्ण, त्याग आणि आर्थिक संघर्ष आहे. या खेळाडूंना पाठिंबा देणे हे केवळ त्यांच्या प्रयत्नांचे बक्षीस नाही तर ते गोव्याच्या क्रीडा भविष्यातील गुंतवणूक आहे, असे हेबळे म्हणतात.
‘हा केवळ जेशुआ आणि त्यांच्या कुटूंबासाठीच नव्हे तर गोवा बास्केटबॉल संघटना आणि बास्केटबॉल खेळाच्या प्रेमींसाठी अभिमानाचा क्षण आहे, असे जीबीएचे अध्यक्ष परिंद नास्नोळकर म्हणाले. प्रतिभेला वाव दिला आणि योग्य व्यासपीठ दिले तर काय साध्य करता येते याचे जेशुआ एक ज्वलंत उदाहरण आहे. त्याचा हा प्रवास भारताची जर्सी घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य तरूणांना प्रेरणा देईल. जेशुआ आता केवळ भारतीय जर्सी घालत नाही तर आता ‘हे शक्य आहे’, हे जाणणाऱ्या अनेकांची स्वप्ने पूर्ण करत आहे. जेशुआचा प्रवास हा केवळ क्रीडा कथेपेक्षा जास्त आहे. दृढनिश्चयाला संधी मिळाल्यावर काय साध्य करता येते याचे जेशुआ एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
-संदीप मो. रेडकर









