वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीच्या महिलांच्या ताज्या वनडे मानांकनात भारतीय संघातील मध्यफळीत खेळणारी फलंदाज जेमीमा रॉड्रिग्जने पहिल्या 20 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. फलंदाजांच्या ताज्या मानांकनात तिचे स्थान तीन अंकांनी वधारले आहे.
राजकोटमध्ये आयर्लंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात 24 वर्षीय जेमिमाने शानदार शतक (102) झळकविल्याने भारताने हा सामना 116 धावांनी जिंकला होता. या कामगिरीमुळे जेमिमाने 563 मानांकन गुणांसह 19 वे स्थान मिळविताना न्यूझीलंडच्या सुझी बेटस्ला मागे टाकले आहे. फलंदाजांच्या ताज्या मानांकनात भारताची उपकर्णधार स्मृती मानधना 723 मानांकन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. लंकेची चमारी अट्टापटू 733 मानांकन गुणासह दुसऱ्या, द. आफ्रिकेची वूलव्हर्ट 773 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिली पाचव्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत इंग्लंडची इक्लेस्टोन 779 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.









