चॉकलेट घशात अडकल्याने श्वास झाला बंद, उपचारापुर्वी झाला मृत्यू
प्रतिनिधी/ सातारा
संभाजीनगर (कोडोली) येथे राहत असलेल्या 1 वर्षाच्या चिमुकलीच्या घशात जेली चॉकलेट अडकले. यामुळे तिचा श्वास बंद झाल्याने तिच्या आईने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाला. शर्वरी सुधीर जाधव असे तिचे नाव आहे. शर्वरीचे मूळ गाव दुशेरे (ता. कराड) हे असून ती औद्योगिक वसाहतीत राहणाऱया मनोहर जाधव यांची नात आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास शर्वरी जाधव हिला शेजारील लहान मुलीने जेलीचे चॉकलेट हातात दिले. हे चॉकलेट तिने स्वतःहून तोंडात घातले. आणि काही सेकंदात हे चॉकलेट घशावाटे श्वास निलिकेत गेले. यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आणि ती खोकू लागली. हे पाहून तिची आई स्मिता जाधव धावत तिच्याजवळ आली. तिने बघितले तर शर्वरीला श्वास घेत येत नव्हता. यामुळे ती घाबरली आणि आरडाओरडा केला. हे पाहून शेजारील देवबा जाधव घरी आले. तोपर्यंत शर्वरी बेशुद्ध झाली होती. तिला तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वी ती मयत झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तिच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास महिला पोलीस नाईक शिंदे करत आहेत.
काळजी घेणे हा एकच उपाय
6 ते दीड वर्षापर्यंत लहान मुले ही वेगात हालचाल करतात. यामुळे त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करून काळजी घेणे आवश्यक असते. घरात घरात शेंगदाणे, फुटाणे, सोयाबीन उघडय़ावर ठेवले जाते. ही मुले तत्काळ असे पदार्थ घशात घालतात. यामुळे श्वास नलिकेत जाऊन फुफ्फुसात अडकून बसतात. या आधीही अशा घटना घडल्या आहेत. यामुळे दिसला शेंगदाणा की कर कुट असे आम्ही सांगतो. चॉकलेट हे देखील कडक असते. ते लवकर विरघळत नाही. अशा घटना घडताच मुलाचे पोट पाठीमागे दाबून अडकलेला पदार्थ बाहेर काढता येतो. परंतु अचानक घडलेल्या या घटनामुळे पालक घाबरून जातात. त्यांना काय करायचे कळत नाही. ते रुग्णालयात नेतात. उपचारादरम्यान, मुलाचा मृत्यू झाला. तर दोष डॉक्टरांना दिला जातो.
डॉ. संदीप आठवले, नाक, कान, घसा तज्ञ








