कार्लोस अल्कारेझ, सित्सिपस, कॅरेन खचानोव्हही शेवटच्या आठ खेळाडूंत, स्टीफेन्स, कॅसात्किना पराभूत
वृत्तसंस्था/ पॅरिस
रशियाच्या कॅरेन खचानोव्हने सलग तिसऱ्या ग्रँडस्लॅममध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठताना लॉरेन्झो सोनेगोचे आव्हान संपुष्टात आणले. त्याच्याप्रमाणे फ्रेंच ओपन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या अन्य खेळाडूंत कार्लोस अल्कारेझ, एलिना स्विटोलिना, आर्यना साबालेन्का, ऑन्स जेबॉर, स्टीफानोस सित्सिपस यांचाही समावेश आहे.

अकराव्या मानांकित खचानोव्हने इटलीच्या लॉरेन्झो सोनेगोवर 1-6, 6-4, 7-6 (9-7), 6-1 अशी मात केली. खचानोव्ह गेल्या यूएस ओपन व यावर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याची उपांत्यपूर्व लढत नोव्हॅक जोकोविचशी होईल. स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने लॉरेन्झो मुसेटीचा 6-3, 6-2, 6-2 असा धुव्वा उडवित शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. दोन तास आठ मिनिटे ही लढत रंगली होती. पहिले दोन गेम्स गमविल्यानंतर अल्कारेझने पुढचे 23 पैकी 18 गेम्स जिंकत सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याची उपांत्यपूर्व लढत ग्रीसच्या सित्सिपसशी होईल.
ग्रीसच्या सित्सिपसने ऑस्ट्रियाच्या सेबॅस्टियन ऑफनरचा 7-5, 6-3, 6-0 असा फडशा पाडत आगेकूच केली. या क्लेकोर्टवरील स्पर्धेत पाचव्या मानांकित सित्सिपसने यापूर्वी पाचपैकी तीन वेळा उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. या मोसमात त्याने ग्रँडस्लॅममध्ये चांगले प्रदर्शन केले असून ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याने अंतिम फेरी गाठली होती.
स्टीफेन्स पराभूत
महिला एकेरीत एलेना स्विटोलिनाने विजयी घोडदौड कायम राखताना नवव्या मानांकित दारिया कॅसात्किनाचा 6-4, 7-6 (7-5) असा पराभव करून शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. तिची उपांत्यपूर्व लढत द्वितीय मानांकित साबालेन्काशी होणार आहे. साबालेन्काने अमेरिकेच्या स्लोअन स्टीफेन्सचे कडवे आव्हान 7-6 (7-5), 6-4 असे संपुष्टात आणत या स्पर्धेची पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. साबालेन्का व स्टीफेन्स दोघीही ग्रँडस्लॅम चॅम्पियन असून क्लेकोर्टवर त्यांच्यात पहिल्यांदाच मुकाबला झाला. साबालेन्काने प्रारंभी 5-0 अशी भक्कम आघाडी घेतली. तिला तीन सेटपॉईंटही मिळाले. पण स्टीफेन्सने जोरदार प्रतिकार करीत सेट टायब्रेकरवर नेला. टायब्रेकरमध्ये साबालेन्काने बाजी मारत सेट जिंकला. महिलांच्या अन्य एका सामन्यात ट्युनिशियाच्या सातव्या मानांकित जेबॉरने वेगवान खेळ करीत उपांत्यपूर्व फेरी गाठताना अमेरिकेच्या बर्नार्डा पेराचा 6-3, 6-1 असा धुव्वा उडविला. तिची पुढील लढत सारा सोरिबेस टोर्मो किंवा 14 वी मानांकित बियाट्रिझ हदाद माइया यापैकी एकीशी होईल.

डोडिग-क्रायसेक उपांत्यपूर्व फेरीत
पुरुष दुहेरीत चौथ्या मानांकित इव्हान डोडिग व ऑस्टिन क्रायसेक यांनी आपला फॉर्म कायम राखत चौथी फेरी गाठताना फ्रान्सिस्को काब्राल व राफेल मातोस यांच्यावर 6-7 (3-7), 6-4, 7-5 अशी मात केली. तीन तास ही झुंज रंगली होती. त्यांची उपांत्यपूर्व लढत जर्मनीच्या केव्हिन क्रॅव्हिट्झ व टिम प्युएट्झ यांच्याशी होईल. क्रॅव्हिट्झने येथील स्पर्धा दोन वेळा आंद्रेयास मायससमवेत खेळताना जिंकली आहे. अन्य एका सामन्यात मार्सेल ग्रॅनोलर्स व होरासियो झेबालोस यांनी मार्सेलो मेलो व जॉन पीयर्स यांचा 6-2, 6-3 असा पराभव करीत आगेकूच केली. ग्रॅनोलर्स-झेबालोस यांनी आतापर्यंत सात एटीपी स्पर्धा जिंकल्या आहेत. पण ग्रँडस्लॅम स्पर्धा त्यांना अद्याप एकत्रित खेळताना जिंकता आलेली नाही.









