घरे वाटपात भ्रष्टाचार केलेल्यांना डच्चू देण्याची मागणी
बेळगाव : गेल्या दोन वर्षांपासून सत्तेत असलेले काँग्रेस सरकार जनतेला प्रभावी प्रशासन देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारच्या सर्व विभागांमध्ये लाचखोरी व भ्रष्टाचार वाढला आहे. गृहनिर्माणमंत्री जमीर अहमद यांनी घरे वाटपात भ्रष्टाचार केला असून, त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची मागणी निवेदनातून जिल्हा जेडीएसच्यावतीने करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून राज्याचा विकास खुंटला असून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे. राज्यात भ्रष्टाचाराने डोके वर काढले असून सरकार विफल ठरत आहे. गृहनिर्माण मंत्र्यांनी खऱ्या लाभार्थ्यांना घरे न देता आपल्या मर्जीतील लोकांना घरे वाटप केली आहेत. राज्यातील जनतेला रस्ते, पूल, तलाव बांधणी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यास सरकारला अपयश येत आहे. कंत्राटदारांची बिलेही वेळेवर देण्यात येत नाहीत. राज्य सरकार गोरगरीब व शेतकरी विरोधी बनले आहे, असा आरोपही निवेदनातून करण्यात आला.









