किश्तवाडमध्ये ‘जैश’च्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, शोधमोहीम सुरूच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू जिल्ह्यातील अखनूर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पंजाब रेजिमेंटचे जेसीओ कुलदीप चंद हुतात्मा झाले. शुक्रवारी रात्री उशिरा अखनूरच्या केरी बट्टल भागात दहशतवाद्यांशी चकमक झाली. लष्कराने ‘एक्स’वर पोस्ट करून ही माहिती दिली. याचदरम्यान, शुक्रवारी किश्तवाड जिह्यातील घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मारले गेलेले तिन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे होते. त्यात टॉप कमांडर सैफुल्लाहचाही समावेश आहे.
अखनूरमध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. भारतीय सैन्याने येथे घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला. दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरने (जेसीओ) शेवटच्या श्वासापर्यंत दहशतवाद्यांशी लढा दिला. या कारवाईदरम्यान दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्यामुळे जेसीओ कुलदीप चंद यांना वीरमरण प्राप्त झाले.
घुसखोरीची माहिती मिळताच भारतीय लष्कर सीमावर्ती भागात अनेक ठिकाणी कारवाई करत आहे. या घटनेपूर्वी भारतीय सैन्याने शुक्रवारी राज्यातील किश्तवाड जिह्यात जैश कमांडरसह तीन दहशतवाद्यांना ठार मारले. यापूर्वी 4 आणि 5 एप्रिलच्या मध्यरात्री बीएसएफ जवानांनी जम्मूमधील नियंत्रण रेषेवरील आरएस पुरा सेक्टरमध्ये एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारले होते. तर 1 एप्रिल रोजी नियंत्रण रेषेवर झालेल्या लष्कराच्या चकमकीत 4-5 पाकिस्तानी घुसखोर मारले गेले. ही घटना पूंछमधील नियंत्रण रेषेवरील कृष्णा घाटी सेक्टरच्या पुढच्या भागात घडली होती.
ध्वज बैठकीनंतरही घुसखोरीचे सत्र
10 एप्रिल रोजी भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात ब्रिगेड कमांडर स्तरावरील बैठक झाली. ही बैठक जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर झाली. या ध्वज बैठकीत (फ्लॅग मिटिंग) सीमेवर शांतता राखण्याशी संबंधित मुद्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र, तरीही पाकिस्तानच्या हद्दीतून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच असल्याचे दिसून येत आहे.









