जुनी बांधकामे पाडण्यासाठी, ढिगारे उपसण्यासाठी किंवा माती लोटण्यासाठी जेसीबी मशिनचा उपयोग भारतात बऱ्याच काळापासून गेला जात आहे. या जेसीबी यंत्राच्या कार्यशक्तीप्रमाणेच त्याची किंमतही अफाट आहे. या यंत्रांचा उपयोग आता सर्वत्र केला जात असूनही लहान मुले किंवा मोठी माणसेही त्यांच्या भोवती त्यांना पाहण्यासाठी गोळा होतात. या यंत्राची कामगिरी पाहून आचंबित होतात.
राजस्थानातील एका प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी असेच एक जेसीबी यंत्र बनविले आहे. आश्चर्य म्हणजे हे जेसीबी यंत्र निर्माण करण्यासाठी या विद्यार्थ्यांना अवघा 30 रुपये खर्च आला आहे. हे वाचून क्षणभर आपला विश्वास बसणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. हा ‘मिनी जेसीबी’ आपल्याला व्हिडीओवर पहावयसा मिळतो. आतापर्यंत त्याला 70 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी विद्यार्थ्यांच्या या सृजनशीलतेचे तोंड भरुन कौतुक केले आहे.
विद्यार्थ्यांनी निर्माण पेलेले हे जेसीबी यंत्र केवळ मोठ्या यंत्राचे छोटे मॉडेल नाही. तर ते मोठ्या यंत्राप्रमाणेच चालणारे आणि काम करणारे यंत्र आहे. ते एका छोट्या टेबलावर ठेवता येते. अर्थातच, हे यंत्र लहान असल्याने त्याची कामे करण्याची क्षमताही त्या प्रमाणात लहान असणे स्वाभाविकच आहे. मात्र हे यंत्र त्याच्या क्षमतेनुसार, ती सर्व कामे करते, जी एक मोठे जेबीसी यंत्र करु शकते. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. अनेकांनी या विद्यार्थ्यांच्या निर्मिती क्षमतेची तुलना मोठ्या संशोधकांच्या कार्याशी केली असून हे विद्यार्थी भविष्यकाळात यंत्रविज्ञान क्षेत्रात मोठी कामगिरी करुन भारताचे नाव उज्ज्वल करतील, अशी भविष्यवाणी केली आहे. भारताने तंत्रविज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न चालविला आहे. या क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्याखेरीज भारताची अर्थव्यवस्था बळकट होणार नाही, याची आता बहुतेकांना जाणीव झाली आहे. विशेषत: गेल्या दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारने आत्मनिर्भरतेला प्राधान्य दिले असून या धोरणाचे सुपरिणामही आपल्याला त्वरितच दिसून आले आहेत. सध्याचे युग हे अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग असून काळाप्रमाणे चालावेच लागणार आहे. तंत्रवैज्ञानिक स्वातंत्र्य निदान मोठ्या प्रमाणात प्राप्त केले नाही, तर केवळ राजकीय स्वातंत्र्याला फारसा अर्थ उरत नाही, याचीही जाणीव आता समाजाला, विशेषत: तरुणाईला होत आहे, हे सुचिन्ह असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.









