
पणजी : गोवा जॅझ अकादमीतर्फे ‘आंतरराष्ट्रीय जाझ डे’ चे औचित्य साधून शनिवार दि. 29 एप्रिल रोजी आग्वाद बंदर येथे संध्याकाळी 6 वाजता जॅझ कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमात कला सादर करण्यासाठी डच सॅक्सोफोनिस्ट बेन व्हॅन डुंगेन आणि त्याचे सहकारी सहभागी होणार आहेत. गोवा जॅझ अकादमीला युनेस्कोने भारतात ‘आंतरराष्ट्रीय जॅझ डे’ आयोजित करण्यासाठी विशेष सहकार्य केले आहे. जॅझ संगीताच्या परिवर्तनीय शक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी या कार्यक्रमात स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कलाकार कला सादर करणार आहेत. रसिकांना डच सॅक्सोफोनिस्ट बेन व्हॅन डुंगेन आणि त्यांचे सहकारी तसेच गोवा जॅझ अकादमीचे प्राध्यापक आणि विद्यार्थी आणि भारतीय जॅझ गिटार वादक करण खोसला आणि त्यांचे सहकारी यांचे सादरीकरण पहायला मिळणार आहे. गोवा जॅझ अकादमीचे सह संस्थापक करण खोसला म्हणाले, की हा कार्यक्रम एक रोमांचकारी अनुभव असल्याचे वचन देतो. हा कार्यक्रम स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय दृश्यातील काही उत्कृष्ट संगीतकार, संगीत आणि पाककृती एकत्र आणेल. गेल्या काही वर्षांत, गोवा जॅझ अकादमीने राष्ट्रीय मंचावर आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक संगीतकारांना प्रशिक्षण दिले आहे. अकादमीचा सर्वसमावेशक अभ्यासक्रम, अत्याधुनिक संसाधने आणि जागतिक दर्जाच्या अध्यापनामुळे याला संगीत शिक्षणासाठी एक प्रमुख संस्था म्हणून प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अधिक माहितीसाठी 91 90214-99484 वर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









