सावंतवाडी –
भंडारी समाजाची लढवय्या समाज म्हणून ओळख आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारा अशीही ओळख आहे. सावंतवाडी भंडारी मंडळाची सुसज्ज वास्तू ही समाजाच्या एकतेचे प्रतीक आहे. एकता अबाधित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. सुसंस्कृत युवा पिढी घडविण्यासाठी वाचन चळवळ महत्वाची आहे. यासाठी भंडारी समाज मंडळाने वाचनालय सुरू करावे. यासाठी माझ्याकडून भरीव स्वरूपात पुस्तके देण्यात येतील. इतर उपक्रमा बरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व कायमस्वरूपी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र सुरू करा व सदर केंद्र सर्व समाजासाठी खुली ठेवा, असे आवाहन मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांनी येथे केले.
सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळाच्या भंडारी भवन व भंडारी हॉस्टेलला भेट भाटकर यांनी भेट दिली. यावेळी मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी भाटकर बोलत होते. सावंतवाडीतील अनेक आठवणींना त्यानी उजाळा दिला. तसेच भंडारी समाज इतिहासाबाबतही त्यांनी थोडक्यात माहिती दिली.सावंतवाडी भंडारी भवन येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी सावंतवाडी भंडारी समाज मंडळाचे प्र अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी देविदास आडारकर, संतोष वैज, नामदेव साटेलकर, प्रविण मांजरेकर, गुरुदास पेडणेकर, समता सूर्याजी, हनुमंत पेडणेकर, दिलीप पेडणेकर गुंडू साटेलकर, वैशाली पटेकर, शीतल नाईक, देवता पेडणेकर, संगीता हडकर , राजेंद्र बिर्जे आदी उपस्थित होते. यावेळी भाटकर यांच्या हस्ते भंडारी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंडळाचे प्रभारी अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर म्हणाले, भाटकर हे समाजाचे भूषण आहे. भंडारी मंडळाला त्यांनी यापुढेही असेच मार्गदर्शन करावे , असे आवाहन केले. अरविंदेकर यांच्या हस्ते तसेच तालुका भंडारी मंडळातर्फे भाटकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव साटेलकर यांनी केले. प्रास्ताविक देविदास आडारकर तर आभार संतोष वैज यांनी मानले.









