प्रतिनिधी,कोल्हापूर
Rajesh Kshirsagar News : चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या जयप्रभा स्टुडीओच्या जागेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता.शनिवारी स्टुडिओच्या जागेबाबत सरकारने दोन प्रस्ताव महानगरपालिकेला दिले आहेत.राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुरावामुळे या प्रश्नावर तोडगा निघाला आहे.त्यामुळे जयप्रभा स्टुडिओत पुन्हा शूटिंग होण्याची शक्यता वाढली आहे.सरकारच्या या निर्णयाचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा प्रश्न मार्गी लावून,स्टुडिओच्या विकासासाठी प्रयत्न करू,अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी दिली होती.त्यांच्या या प्रयत्नास यश आले असून,मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाने तीन ऑगस्ट 2023 रोजीच्या पत्रान्वये आदेशित केले आहे.यामध्ये या जागेबाबत निर्णय घेण्याचे दोन पर्याय शासनाने कोल्हापूर महानगरपालिकेस दिले आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेने जयप्रभा स्टुडीओच्या (बी वॉर्ड मधील सि.स.नं.2814क/1) जागेच्या मोबदल्यात श्री.महालक्ष्मी स्टुडीओ एल.एल.पी.फर्म यांना पर्यायी जागा परस्पर सहमतीने उपलब्ध करून देऊन सदर जागा ताब्यात घ्यावी. पर्याय दोन नुसार पर्याय एक प्रमाणे कार्यवाही शक्य नसल्यास, या जागेतील हेरीटेज जागेच्या संपादनाच्या मोबदल्यात उर्वरित जागेत जमीन मालकास बांधकामास परवानगी देवून विकास हस्तांतरणीय हक्क (ऊअ) उपलब्ध करून देण्यात यावा.असा निर्णय घेतल्याने जयप्रभा स्टुडीओच्या जागेचा विषय निकाली निघाला आहे.त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी साखर-पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे.









