सांगली :
वसंतदादा पाटील यांच्या नातसून व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री मदन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी 18 जून रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. वसंतदादा घराणे सुसंस्कृत आहे. वसंतदादा घराण्याची आणि आरएसएसची विचारधारा सामान्यांची उन्नती करणारी आहे. या घराण्यातील श्रीमती जयश्री पाटील भाजपामध्ये आल्यावर त्यांना योग्य सन्मान देण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
सोमवारी सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या विजय बंगल्यात जावून जयश्रीवहिनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांनी श्रीमती जयश्रीवहिनी पाटील यांचा सत्कार केला आणि भाजपामध्ये येत असल्याबद्दल आभारही मानले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, जयश्रीवहिनी कोणतीही अट न ठेवता भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करत आहे. त्यांच्या येण्याने सांगलीत भाजपाला आणखीन ताकत आली आहे. वसंतदादा बँकेच्या माध्यमातून त्यांना आलेल्या अडीअडचणी आपण स्वत:हून सोडवणार असल्याचा शब्द त्यांनी दिला.
वसंतदादा घर हे महाराष्ट्रातील महत्वाचे घर आहे. त्यांच्या घरातील व्यक्ती भाजपामध्ये येते, त्यांना योग्य संधी देण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीमध्ये त्यांच्यासाठी दोन जागा राखीव ठेवल्याचे पाटील यांनी सांगितले. भाजपा व वसंतदादा घराणे एका विचारधारेने चालतात, यामुळे जयश्रीवहिनी भाजपामध्ये तत्काळ रूळतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
- तीन महिन्यापासून चर्चा
त्यांना भाजपामध्ये आणण्यासाठी तीन महिन्यापासून प्रयत्न सुरु होता. त्याला आज यश मिळाले आहे. यामागे माजी उपमहापौर शेखर इनामदार आणि जनसुराज्यचे नेते समित कदम आहेत. या दोघांनी सातत्याने जयश्रीवहिनीशी संपर्क ठेवला आणि त्यांचे मन वळविले आहे. त्यामुळे जयश्रीवहिनी भाजपामध्ये येण्यास तयार झाल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
- विशाल पाटील यांनी तत्काळ निर्णय घ्यावा
खासदार विशाल पाटील यांनाही आपण भाजपामध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे. विशाल पाटील यांनी आमंत्रणाला अद्यापही साथ दिली नाही. पण त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा 2029 साली आमचा उमेदवार तयार आहे. त्यामुळे विशाल पाटील यांनी याचा विचार करावा असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
- बँक प्रकरणातून बाहेर काढणार
वसंतदादा बँक प्रकरणांतून फक्त जयश्रीवहिनीचे कुंटुंब नव्हे तर कार्यकर्त्यांनाही बाहेर काढणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. वसंतदादा बँकेचे जे भूत जयश्रीवहिनी आणि त्यांच्या संचालकांच्या मानगुटीवर बसले आहे. ते पूर्णपणे संपून जाईल असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
- कार्यकर्त्याच्या हितासाठी निर्णय : जयश्रीवहिन
गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने कार्यकर्त्यांच्या हितासाठी आमच्या चर्चा सुरू होत्या. कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितले की आपण भाजपामध्ये जावूया. यामुळे हा निर्णय घेतला आहे. मला काँग्रेस पक्षातून काढून टाकले आहे. आम्ही कोणत्याही पक्षात जावू शकतो. त्यानुसार आम्ही भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे श्रीमती जयश्रीवहिनी यांनी स्पष्ट केले
- त्यांचे भाजपात जाणे अनैसर्गिक : खासदार विशाल पाटील
मदनभाऊ गटाच्या नेत्या जयश्री पाटील यांनी भाजपामध्ये जाणे अनैसर्गिक ठरणार आहे. त्या भाजपामध्ये जाणे रूचणारे नाही, अशी टिका खासदार विशाल पाटील यांनी केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपणास भाजपामध्ये येण्याची जी ऑफर दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो. पण आपण सध्या कोठेही जाणार नसल्याचे खासदार विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विशाल पाटील म्हणाले, श्रीमती जयश्री पाटील यांनी घेतलेला निर्णय दबावाखाली घेतला असण्याची शक्यता आहे. या निर्णयाबद्दल आपण काहीच बोल्t शकत नाही. जयश्री वहिनीचा निर्णय जनतेला रूचेल असे वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.








