वेर्ले येथील जयश्री राऊळ यांचे निधन
ओटवणे | प्रतिनिधी
गेले दोन तप न चुकता पंढरपूर वारी करत असलेल्या माय माऊलीचे तिच्या इच्छेप्रमाणे शनिवारी पांडुरंगाच्या पावन भूमीत पंढरपूर क्षेत्री देहावसान झाले. पांडुरंगाच्या महाउत्सवात वैकुंठवासी झालेल्या या सौभाग्यवतीचे जयश्री सखाराम राऊळ (६९) असे नाव असून सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले- गावठणवाडी येथील ती आहे.रविवारी पहाटे तीन वाजता त्यांचे पार्थिव पंढरपूर येथून वेर्ले गावी आणण्यात आले. त्यानंतर या माय माऊलीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी वारकरी संप्रदायासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. रविवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी सैनिक सखाराम राऊळ यांच्या त्या पत्नी तर रिक्षाचालक विजय राऊळ, बँकिंग क्षेत्रातील सिसको कंपनीचे वाहन चालक पपू राऊळ यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, दिर, जाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.









