वारणानगर / प्रतिनिधी
ख्रिश्चन धर्मियांची पंढरी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळामधील कोडोली येथील चर्चची ओळख आहे. दोन दिवसावर येवून ठेपलेल्या नाताळ उत्सवाची जय्यत तयारी याठिकाणी अंतिम टप्यात आली असून या उत्सवात सहभागी होण्यास येणाऱ्या भाविकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन कोडोलीच्या सरपंच गायत्री पाटील, उपसरपंच माणिक मोरे यानी केले आहे.
कोडोलीतील ख्रिश्चन चर्चचे धार्मिक स्थळ १०३ वर्षाचे जुने आहे. कोडोलीसह बाहेरच्या जिल्ह्यातून हजारो भाविक नाताळ निमीत्त येत असतात. यावर्षी नाताळ निमीत्त संघटनानी व मंडळानी विविध कार्यक्रम ठेवले आहेत. यामध्ये रक्तदान शिबीर,वह्या वाटप, वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम,क्रिडा स्पर्धा आयोजीत केल्या आहेत.
नाताळ निमीत्त मुख्यचर्चमध्ये सकाळ पासून रात्री उशीरा पर्यन्त धार्मिक विधी, प्रार्थना तसेच गोरगरीब नागरिकांना तसेच निराधार विधवा महिलांना कपडे,वस्तूचे दान केल जाते. होणारी गर्दी लक्षात घेता नव्या कोरोनाओमीक्रॉन सब टायल बीएफसेव्हन प्रसार रोखण्यासाठी भाविकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. नवीन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जागरूक करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली आहे. तसेच स्वच्छतेवर भर दिला असून प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे असे कोडोली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण यानी सांगितले.