जितेंद्र आव्हाड यांनी हे वृत्त खोडसाळपणाचे ठरवले
By : शिवराज काटकर
सांगली : महाराष्ट्राच्या राजकारणात एका मोठ्या घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सात वर्षे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणारे जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, अशी अचानक चर्चा सुरु झाली आहे.
शुक्रवारी रात्री विधानसभेचे कामकाज आटोपून मतदारसंघात आलेल्या जयंतराव यांना या घटनेचा ना इन्कार करता आला ना होकार देता आला. कारण, पक्षाच्या बैठकीत नव्या रक्ताला वाव देण्याची मागणी तर त्यांचीच होती आणि पवारांनी बदलावर विचार करू, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर असे सांगून पक्षातील तरुण तुर्कांच्या मनसुब्याला सबुरीचा घास भरवला होता.
अचानक चर्चा उठली आणि 15 जुलैला पद सोडावे लागणार, असे वातावरणच तयार झाले. त्यानुसार रोहित पवार, शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रियाही दिली. तर जितेंद्र आव्हाड यांनी हे वृत्त खोडसाळपणाचे ठरवले. हा खोडसाळपणा कोणी केला, हे त्यांनाही माहिती असावेच!
ही घटना केवळ पक्षांतर्गत नेतृत्व बदलापुरती मर्यादित नसून, त्या मागील राजकीय डावपेच, दबाव आणि जयंत पाटील यांच्या वैयक्तिक राजकीय प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. पवार यांनी अध्यक्ष बदलावर शिक्कामोर्तब केले तर एका अर्थाने जयंत पाटील यांना पक्षाने ‘निरोप’ दिला, असाच अर्थ होईल. या घटनेने जयंत पाटील यांच्या नाराजीबाबत, पक्षांतर्गत कुरघोडीबाबत आणि त्यांच्या भविष्यातील राजकीय दिशेबाबत अनेक प्रश्न आहेत.
या घडामोडीमागील संभाव्य कारणांचा शोध घेतल्यास एक निष्ठावान आणि प्रभावशाली नेत्याला पद का सोडावे लागते, याचा थोडासा अंदाज येतो. जयंत पाटील यांनी 2014 पासून 2025 पर्यंतच्या दशकातील पडझडीच्या काळातील सात वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली.
या काळात पक्षाने अनेक संकटांना तोंड दिले, विशेषत: 2019 ते 2022 या कालावधीत पक्ष सत्तेत असताना आणि त्यानंतरच्या काळात अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या फुटीने पक्षाला मोठा धक्का बसला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेससोबत आघाडी स्थापन करून सत्तेत सहभाग घेतला.
या काळात जयंत पाटील यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. पडझडीनंतरही पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. राज्यभर यात्रा, कार्यक्रम आणि जनसंपर्क मोहिमा राबवल्या. रायगड येथे नव्या चिन्हाचा स्वीकार करताना जयंत पाटील यांनी स्वत: तुतारी फुंकून पक्षाच्या नव्या ओळखीला प्रतीकात्मक बळ दिले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाला चांगले यश मिळाले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्राने जोराचा धक्का दिला. जयंत पाटील यांना कधी ना कधी पद सोडायचे होते. पण ज्या रितीने त्याची चर्चा उठवली, ती चुकीची होती. पक्षांतर्गत कुरघोडी, सत्ताधारी पक्षांचा दबाव आणि वैयक्तिक राजकीय भविष्याचा विचार यामुळे त्यांना बाजूला व्हावे लागेल. सत्ताधारी आणि स्वपक्षातील हा चक्रव्यूह जयंतराव कसा भेदतात की नवे संकट ओढवून घेतात, हे येणारा काळच ठरवेल.
शरद पवार यांचे डावपेच आणि जयंत पाटील
शरद पवार यांचा राजकीय डावपेचांचा इतिहास पाहता, त्यांनी नेहमीच पक्षातील नेत्यांना संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जयंत पाटील यांना पदावरुन बाजूला करण्यामागे शरद पवार यांचा आशीर्वाद आहे की नाही, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
जर हा निर्णय शरद पवार यांच्या संमतीने झाला असेल, तर तो पक्षाला नवे नेतृत्व देण्याचा आणि तरुणांना संधी देण्याचा भाग असू शकतो. पण पक्षाच्या प्रथेनुसार प्रदेशाध्यक्षाने पद दुसऱ्याला बहाल करायचे असेल तर राजीनाम्याची चर्चा कोण आणि का उठवली?
भविष्यातील शक्यता
जयंत पाटील त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. त्यांच्या पुढील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते शरद पवार गटातच राहतील, अजित पवार गटात जातील, भाजपशी हातमिळवणी करतील की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जातील, याबाबत अटकळी बांधल्या जात आहेत. हा निर्णय त्यांच्या राजकीय प्रवासाला नवी दिशा, गती देऊ शकतो. पण राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसू शकतो.








