राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर त्यांनी मूळ पक्ष सोडला नाही.
By : संतोष पाटील
Jayant Patil : सावज टप्प्यात आले की त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यात माहीर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचे संकेत दिले. त्यामुळे जयंतरावांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, याचा ठाव कोणालाच नाही.
भाजपची वियजी घोडदौड सुरू होण्यापूर्वीपासून ऑफरकडे दुर्लक्ष करत शरद पवार यांच्या नेतृत्वावर जयंत पाटील यांनी विश्वास ठेवत राजकारण सुरू ठेवले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पक्षांतर्गत वाद असूनही आपला वेगळा ठसा उमटवण्यात जयंतराव यशस्वी ठरले आहेत.
सांगली जिह्यात साहेब म्हणवून घेत त्या तोडीचे राजकारण करणारे जयंतराव पाटील खरंच साहेबांना सोडतील? राजकीय विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करत आपली वेगळी ओळख कायम ठेवणार याची उत्सुकता असतानाच जयंतरावांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, याचा ठाव आजतरी कोणालाच नाही.
अमेरिकेतून उच्च शिक्षणाची पदवी घेऊन आल्यानंतर वडिलांचे निधन झाल्याने खूपच तरुण वयात आमदारकीची जबाबदारी जयंत पाटील यांच्या गळ्यात पडली. स्वर्गीय राजारामबापू पाटील आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष राज्याला परिचित होता.
दादा आणि बापू यांनी काँग्रेसची विचारधारा धरुनच राजकारण केले. उत्तरोत्तर काळात दादा घराण्यासोबत छुपा मात्र तितकाच तीव्र यशस्वी संघर्ष जयंत पाटील यांनी केला. स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्यासारख्या ताकदीच्या समवयस्क पक्षांतर्गत जिह्यातील राजकीय स्पर्धा करत प्रसंगी अजित पवार यांच्या विरोधाला तोंड देत राष्ट्रवादीत आणि राज्याच्या राजकारणात आपली ओळख दृढ केली.
प्रतिस्पर्ध्याचा करेक्ट कार्यक्रम हा उदाहरणासह शब्द राज्याला देणाऱ्या जयंत पाटील यांना भाजपची 2013 पासून पक्षात येण्याची ऑफर होती. राज्यातील मुख्यमंत्रीपद तसेच केंद्रातील संरक्षण आणि गृह सोडून कोणतेही पद देऊ, असे भाजप श्रेष्ठींनी निरोप दिल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.
सुरूवातीला काँग्रेस आणि त्यानंतर 1999 पासून शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत ते कायम आहेत. सर्वाधिक काळ राज्याचे अर्थमंत्री म्हणून नऊ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा त्यांचा विक्रम आहे. गृह विभागासह ग्रामविकास, जलसंपदा खात्याची धुराही त्यांनी सांभाळली.
राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर त्यांनी मूळ पक्ष सोडला नाही. अजित पवार यांच्यावर कडक शब्दात टीकेची राळ उठवली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या निर्णायक जागा निवडून आल्या असत्या तर जयंत पाटील हेच कदाचित मुख्यमंत्री पदाचा चेहरा असते. मात्र राजकारणात जर–तर ला काही अर्थ नसतो.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली. सांगली जिह्यात भाजपने मंत्रीपदाचा कोटा रिकामा ठेवल्याने चर्चेला जोर आला. मात्र जयंत पाटील यांनी आपल्या खासियतीप्रमाणे चेहऱ्यावरील रेषही हलू न देता ही राजकीय चर्चा आजपर्यंत गरम ठेवली आहे.
जयंतरावांनी 10 जून 2025 रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी शरद पवार यांना उद्देशून सांगितले, ‘मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे.
तुमच्या सर्वांसमोर मी विनंती करतो की, पवार साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा‘. या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी ‘नाही, नाही‘ अशी घोषणाबाजी करत त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवला. जयंत पाटील यांनी 2018 पासून प्रदेशाध्यक्षपद सांभाळले असून, गेल्या सात वर्षांत त्यांनी पक्षाला अनेक संकटातून बाहेर काढले.
विशेषत: 2023 मधील पक्ष फुटीच्या संकटात त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहून पक्षाचे नेतृत्व केले. अजित पवार यांच्यावर कडक शब्दात टीकास्त्र सोडले. अशा स्थितीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाची चर्चा असताना जयंत पाटील यांची भविष्यातील राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने असणार याची उत्सुकता राज्यातील सर्वांनाच लागली आहे.
दोलायमान स्थिती…!
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याने रोज एक मुहूर्त काढला जात आहे. जयंत पाटील हे अजित पवार यांचे राजकीय नेतृत्व मान्य करुन भविष्यातील राजकारण करतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांना वाटत नाही. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याची सूतराम शक्यता नाही. ठाकरे गट शिवसेनेची राजकीय अवस्था पाहता तिथे त्यांना पाहिजे तसा स्पेस नाही. काँग्रेस हाच त्यांच्या विचारांचा पाया असला तरी संस्थात्मक राजकारण टिकवण्यासाठी लागणारी ताकद तूर्तास इकडून मिळू शकत नाही.
भाजपमध्ये त्यांना मराठा चेहरा आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणातील उपयोगिता म्हणून स्पेस आहे. मात्र पहले आप चा फंडा दोन्ही बाजूंनी सुरू आहे. त्यामुळे पुढील राजकीय वाटचाल आणि दिशा याबाबत जयंतरावांच्या मनात आहे तरी काय? या भल्या मोठ्या प्रश्नचिन्हातच सर्वकाही दडले आहे.








