वृत्तसंस्था/ बिजनौर
राष्ट्रीय लोकदल प्रमुख जयंत चौधरी यांनी रालोआत सामील होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जयंत यांचे आजोबा चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देण्यात येणार असल्याच्या घोषणेनंतरच ते रालोआच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले होते. याचदरम्यान जयंत चौधरी यांनी बिजनौरचे बसप खासदार मलूक नागर यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला वेगळे स्वरुप प्राप्त झाले आहे.
पश्चिम उत्तरप्रदेशातील बिजनौर लोकसभा मतदारसंघाचे बसप खासदार नागर यांनी चौधरी अजित सिंह यांच्या जयंतीदिनी जयंत चौधरी यांची भेट घेतल्याने अनेक राजकीय कयास वर्तविले जात आहेत. मलूक हे मागील काही काळापासून जयंत चौधरी यांचे कौतुक करत आहेत. मलूक हे बसपला रामराम ठोकून रालोदमध्ये सामील होणार असल्याचे मानले जात आहे. तसेच त्यांना रालोआच्या वतीने बिजनौरची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. नागर यांनी रालोदमध्ये प्रवेश केल्यास मायावती यांना मोठा झटका बसू शकतो.









