भाजपशी हातमिळवणी करणार : लोकसभेच्या 2 जागा मिळणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिलेल्या झटक्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही विरोधकांच्या आघाडीला धक्का बसला आहे. राष्ट्रीय लोकदल हा पक्ष या आघाडीतून बाहेर पडला असून त्या पक्षाने भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करून लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे, अशी निश्चित स्वरुपाची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या निर्णयाची अधिकृत घोषणा 12 जानेवारीला केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल या पक्षांमध्ये या संबंधीची चर्चा केली जात होती. सध्या चौधरी हे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेशसिंग यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या आघाडीत आहेत. तथापि, यादव यांच्याशी त्यांचे मतभेद झाले आहेत. जागावाटप आणि आघाडीची निष्क्रीयता हे वादाचे मुद्दे आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
2 जागा मिळविणार
राष्ट्रीय लोकदलाचा भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत लवकरच प्रवेश होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकदल या पक्षाला बाघपत आणि बिजनौर या दोन जागा दिल्या जाणार आहे. तसेच एका राज्यसभेच्या जागेचे आश्वासनही या पक्षाला देण्यात आले आहे.
जाट समुदायावर प्रभाव
राष्ट्रीय लोकदल हा पक्ष माजी दिवंगत पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्याशी संबंधित आहे. या पक्षाचा मूळ पक्ष असणाऱ्या भारतीय लोकदल या पक्षाची स्थापना चरणसिंग यांनी साठच्या दशकात केली होती. पुढे तो पक्ष जनता पक्षात विलीन झाला होता. जनता पक्षची छकले उडाल्यानंतर तो निर्माण झाला आहे. या पक्षाचा, पश्चिम उत्तर प्रदेशात मेठ्या संख्येने असणाऱ्या जाटांवर प्रभाव आहे. उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा मतदारसंघांपैकी 27 मतदारसंघात जाटांची संख्या लक्षणीय असल्याचे बोलले जाते. हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आल्याने पश्चिम उत्तर प्रदेशात आघाडीला लाभ होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
विरोधी आघाडीला धक्का
राष्ट्रीय लोकदलाने बाहेर पडण्याचा आणि भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने उत्तर प्रदेशात विरोधकांच्या ऐक्याच्या प्रयत्नाला मोठा तडा गेला आहे. आता या राज्यात या आघाडीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हे दोनच पक्ष राहिले आहेत. या दोन पक्षांमधील जागावाटपातही समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सपने एकतर्फी 16 जागांवरील आपले उमेदवार घोषित केले आहेत.









