सांगरूळ / वार्ताहर
गेली अडतीस दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या न्याय मागण्यांसाठी बेमुदत आंदोलनाला बसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न त्वरीत मार्गी लावा,अशी मागणी आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आसगावकर यांनी दिली.
आमदार आसगावकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत बाजू मांडली.यावेळी आसगावकर यांनी अघोषित शाळा,अनुदानाबाबत त्रुटी पूर्तता,वाढीव पदे,टप्पा अनुदान आदी प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांच्याशी चर्चा केली.तसेच शिक्षक बांधव आपले घरदार, संसार वाऱ्यावर सोडून मैदानावर बसले आहेत. त्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका. त्यांना न्याय द्या अशी मागणी केली.