गावोगावी भगवे ध्वज, भगव्या पताका, भगव्या कमानी : मंदिरांत अखंड नामजप, हनुमान चालीसा पठण, महाआरती, प्रवचन, महाप्रसाद वितरण
वार्ताहर /सांबरा
तालुक्यातील विविध गावांमध्ये सोमवारी अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम करून हा सोहळा भव्य प्रमाणावर साजरा करण्यात आला. त्यामुळे तालुक्यातील विविध भागांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण होऊन जणू रामनगरीच अवतरली होती. गावोगावी भगवे ध्वज, भगवा पताका व भगव्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. तर शुभेच्छा फलकही झळकत होते. अनेक मंदिरांत अखंड नामजप, हनुमान चालीसा पठण, महाआरती, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभू श्री रामाच्या घोषणा देण्यात येत होत्या. तब्बल पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रभू श्रीरामचंद्र हे अयोध्यामध्ये विराजमान झाले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक गावामध्ये भक्तांनी धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. तसेच प्रत्येक घरोघरी भगवे ध्वज लावण्यात आले होते. तर महिलांनी घरासमोर रंगीबेरंगी रांगोळ्या रेखाटल्या होत्या व सायंकाळच्या वेळी सर्वांनी आपापल्या घरासमोर व मंदिरांसमोर अनेक दीप प्रज्वलित केले होते. त्यामुळे जणू दिवाळीच असल्याचा भास सर्वत्र होत होता.
सांबरा येथे महाआरती, दीपोत्सव, महाप्रसाद
सांबरा येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने लक्ष्मी गल्लीतील महालक्ष्मी मंदिरामध्ये सोमवारी सकाळी महाआरती व हनुमान चालीसा पठणाचे आयोजन केले होते. यावेळी महिला व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाआरतीनंतर सात वेळा सामूहिक हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. सायंकाळी कलमेश्वर गल्ली येथे श्री कलमेश्वर युवक मंडळ व श्रीराम सेना हिंदुस्थान शाखेतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले होते.महाप्रसादासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. रात्री शिवप्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीपोत्सवाचे आयोजन केले होते.
बाळेकुंद्री खुर्द येथे भव्य शोभायात्रा
बाळेकुंद्री खुर्द येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, देवस्थान कमिटी व ग्रामस्थांतर्फे मारुती मंदिर व कलमेश्वर मंदिरात अभिषेक घालण्यात आला. यावेळी श्रीरामाचा अखंड जयघोष करण्यात आला. याप्रसंगी दशरथ चौबारी, प्रवीण मुरारी, ऋतिक पाटील, हनुमंत हन्नीकेरी, जोतिबा नागेनट्टी, मंदिराचे पुजारी, लक्ष्मण गुरव व निखिल हिरेमठ, आदर्श चौगुले, चेतन चिलवाल, रमेश मुतगेकर, बाहुबली होसकेरीसह देवस्थान कमिटीचे सदस्य उपस्थित होते. सायंकाळी भव्य शोभायात्राही काढण्यात आली.
मुतगे येथे अभिषेक-महाप्रसाद
मुतगे येथे सकाळी हनुमान मंदिरामध्ये अभिषेक कार्यक्रम झाला. त्यानंतर दिवसभरात वारकरी भजनी मंडळाची भजनसेवा झाली. सायंकाळी सातनंतर महाप्रसाद वाटपास प्रारंभ करण्यात आला.
गौंडवाड येथे आनंदोत्सव-भक्तीपूर्ण सोहळा
सोमवारी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन तसेच श्री रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त गौंडवाड येथे आनंदोत्सव व भक्तीपूर्ण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण गावभर भगव्या पताका व भगवे झेंडे श्रीराम यांच्या प्रतिकृती यामुळे सारे गाव भगवेमय व राममय झाले होते. यानिमित्त सकाळी गावातील श्री हनुमान मंदिरामध्ये मूर्तीवर अभिषेक घालून काकड आरती म्हणण्यात आली. त्यानंतर पूजाविधी आटोपून सकाळी 8 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत भजन त्यानंतर 11 ते 1 पर्यंत श्रीराम जय जय रामचा जप करण्यात आला. दु. 1 ते 2.30 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत रामरक्षा स्तोत्राचे पठण करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संध्याकाळी 7.30 ते 8.30 भजन, 8.30 ते 9 हनुमान चालीसा पठण. त्यानंतर रात्रीही महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.









