वृत्तसंस्था/ दुबई
भारतीय क्रिकेट मंडळाचे मावळते सरचिटणीस जय शहा यांनी रविवारी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या (आयसीसी) चेअरमनपदाचा पदभार स्वीकारला. आयसीसीचे चेअरमनपद भूषविणारे जय शहा हे पाचवे भारतीय आहेत.
36 वर्षीय जय शहा यांनी गेली पाच वर्षे भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे सचिवपद भूषविले होते. आयसीसीच्या चेअरमनपदासाठी जय शहा यांची एकमताने निवड करण्यात आली. यापूर्वी न्यूझीलंडचे अॅटर्नी ग्रेग बार्कले हे आयसीसीचे चेअरमन होते. बार्कले यांनी आयसीसीचे अध्यक्षपद सलग तिसऱ्यांदा भूषविण्यास स्पष्ट नकार यापूर्वी दिला होता. भारताच्या जगमोहन दालमिया, शरद पवार, शशांक मनोहर आणि प्रख्यात उद्योगपती एन. श्रीनिवासन यांनी यापूर्वी आयसीसीचे अध्यक्षपद भूषविले होते. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा भरवली जाणार आहे. मात्र या स्पर्धेत भारतीय संघाने पाकमध्ये खेळण्यास स्पष्ट नकार दर्शविला. आता यासंदर्भात हायब्रीड मॉडेलची अंमलबजावणी करण्यासाठी आयसीसीला अधिक प्रयत्न करावे लागतील.









