हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिला अखेरचा निरोप
सांगरूळ / वार्ताहर
शहीद जवान विनायक सणगर अमर रहे च्या घोषणा देत जवान विनायक यांचेवर सांगरुळ येथे रविवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठा बटालियनच्या जवानांनी यावेळी मानवंदना दिली. यावेळी लाडक्या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठीसांगरूळ सह परिसरातील ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
विनायक दत्तात्रय सणगर यांचे शुक्रवारी सायंकाळी चंदिगड मध्ये हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव चंदिगड येथून रविवारी सकाळी सांगरुळ गावात आणले. यावेळी शहिद जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रा जयंत आसगावकर, लोकनियुक्त सरपंच शितल खाडे यांनी श्रद्धांजली वाहिली.
२०० १ सली विनायक सणगर भारतीय सेनेमध्ये भरती झाले. सध्या विनायक हवालदार पदावर कार्यरत होते . ते जवानांना रणगाड्याचे प्रशिक्षण देत होते . दोन महिन्यांपूर्वी सुट्टी घेऊन ते गावी आले होते. दरम्यान सुट्टी संपवून १० तारखेला चंदिगड मध्ये रुजू झाले. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव पुणे बटालियन मध्ये खास विमानाने आणण्यात आले .तेथे त्यांना पुणे बटालियनच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली . पुणे येथून मराठा बटालियनच्या वाहनातून रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव सांगरुळ या मुळं गावी आणण्यात आले. अंत्ययात्रेची तयारी सांगरुळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढली होती .सजवलेल्या वाहनातून विनायक सणगर यांची त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली.भारत माता की जय, वंदे मातरम,शहीद जवान विनायक सणगर अमर रहे च्या घोषणा देत विनायक सणगर यांचेवर सांगरूळ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . पुतण्या हर्ष सणगर यांने चितेला अग्नी दिली. विनायक सणगर यांच्या पश्चात पत्नी तीन लहान मुली विवाहित भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, सांगरुळमध्ये आज दिवसभरात गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून श्रध्दांजली वाहिली. यावेळी सुभेदार वसंत पाटील , सुभेदार एम एम जोशी,सुभेदार नामदेव रोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत चव्हाण, केदारी पाटील,प्रांत अधिकारी विवेक काळे, तहसीलदार स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी राजेंद्र जाधव, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, निवास वातकर, माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, राहुल खाडे, सुशांत नाळे जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड अधीक्षक अशोक पवार गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळाचे कार्यकर्ते तलाठी ग्रामसेवक व ग्रामस्थ परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कुटुंबाचा प्रमुख आधार हरपला
जवान विनायक सणगर यांना श्रद्धा, आराध्या व वीरा या तीन लहान मुली असून भाऊ संतोष अल्पभूधारक शेतकरी आहे. मुली व भावाबरोबर बहिणीच्यासाठी विनायक हे प्रमुख आधार होते .त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा मोठा आधार नाहीसा झाला आहे .









