वृत्तसंस्था / रांची
उत्तरप्रदेशचा 25 वर्षीय भालाफेकपटू ऋषभ नेहराने येथे 64 व्या राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सुवर्णपदक जिंकून 80 मी. क्लबमध्ये सामील होत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
नेहराने तिसऱ्या प्रयत्नात 80.12 मी. अंतरापर्यंत भाला फेकला जो त्याच्यासाठी निर्णायक ठरला. नेहराची मागील सर्वोत्तम कामगिरी तीन वर्षांपूर्वी 77.38 मी. होती. नेहरासाठी हा हंगाम खूपच गोंधळलेला होता. कारण त्याने काही अडचणींना तोंड दिले आणि देशातील काही मोठ्या स्पर्धा वगळल्या. तथापि, आत्मविश्वासाने सज्ज होवून तो रांचीमध्ये एक नवीन सीमारेषा गाठण्यात यशस्वी झाला. ‘80 मी. क्लबमध्ये सामील झाल्याने माझा आत्मविश्वास वाढला आहे. आता मी या हंगामात नवीन उंची गाठली आहे. 2026 अधिक रोमांचक असेल,’ असे तो म्हणाला.
आशियाई पदक विजेती पूजा महिलांच्या 800 मी. स्पर्धेत इतरांपेक्षा वरचढ होती. दोन लॅपच्या शर्यतीत ती आरामात विजेती ठरली. पुरूष 100 मी. विजेता सेवा संघाचा मणिकांत होबलीधर आणि रेल्वेचा 800 मी. सुवर्णपदक विजेती पूजा यांना अनुक्रमे सर्वोत्तम पुरूष आणि महिला खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे सेवा संघाने 152 गुणांसह पुरूष संघाचा करंडक जिंकला तर रेल्वेने 175 गुणांसह महिला संघाचा करंडक जिंकला. रेल्वेने 274 गुणांसह एकूण संघाचा करंडकही जिंकला.









