हंगेरीत 19 पासून जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा, भारताचे 28 खेळाडूंचे पथक सहभागी होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भालाफेकमधील ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा येत्या 19 ऑगस्टपासून बुडापेस्ट, हंगेरी येथे सुरू होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे नेतृत्व करेल. 28 खेळाडूंचे पथक यात भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. एका अनपेक्षित घडामोडीमध्ये क्रीडा मंत्रालयाने या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. एरव्ही भारतीय अॅथलेटिक्स महासंघ अशा संघाची घोषणा करत असतो.
गोळाफेकमधील आशियाई विक्रमधारक तजिंदरपाल सिंग तूर याने 19 ते 27 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेतून माघार घेतली आहे. जुलैमध्ये आशियाई स्पर्धेदरम्यान झालेल्या कंबरेच्या दुखापतीतून तो सावरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय विक्रम नावावर असलेला उंच उडीपटू तेजस्वीन शंकर, 800 मीटर शर्यतीतील धावपटू के. एम. चंदा आणि 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सहभागी होणारी अॅथलीट प्रियांका गोस्वामी (राष्ट्रीय विक्रम धारक) यांनीही जागतिक स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. हांगझाऊ येथे होणाऱ्या आशियाई खेळांवर (23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर) लक्ष केंद्रीत करायचे असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, 2022 मध्ये युजीन, अमेरिका येथे झालेल्या मागील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर डायमंड लीग विजेता चोप्रा बुडापेस्टमध्ये सुवर्णपदक जिंकण्याच्या प्रयत्नात राहणार आहे.
संघ : महिला-ज्योती याराजी (100 मीटर हर्डल्स), पाऊल चौधरी (3000 मीटर स्टीपलचेस), शैली सिंग (लांब उडी), अन्नू राणी (भालाफेक), भावना जाट (20 किमी चालण्याची शर्यत).
पुरुष-कृष्ण कुमार (800 मीटर), अजय कुमार सरोज (1500 मीटर), संतोष कुमार तमिलारसन (400 मीटर हर्डल्स), अविनाश मुकुंद साबळे (3000 मीटर स्टीपलचेस), सर्वेश अनिल कुशारे (उंच उडी), जेस्विन ऑल्ड्रिन (लांब उडी), एम. श्रीशंकर (लांब उडी), प्रवीण चित्रवेल (तिहेरी उडी), अब्दुल्ला अबुबाकर (तिहेरी उडी), एल्डहोजे पॉल (तिहेरी उडी), नीरज चोप्रा (भालाफेक), डी. पी. मनू (भालाफेक), किशोर कुमार जेना (भालाफेक), आकाशदीप सिंग (20 किलोमीटर चालण्याची शर्यत), विकास सिंग (20 किलोमीटर चालण्याची शर्यत), परमजित सिंग (20 किलोमीटर चालण्याची शर्यत), राम बाबू (35 किलोमीटर चालण्याची शर्यत), अमोज जेकब, मोहम्मद अजमल, मोहम्मद अनस, राजेश रमेश, अनिल राजलिंगम, मिजो चाको कुरियन (पुरुषांची 4×400 मीटर शर्यत).









