88.77 मीटरची भालाफेक करून जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश
वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
भारताचा ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्राला जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी तसेच 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यास फक्त एका मोठ्या भालाफेकीची आवश्यकता होती. ती त्याने शुक्रवारी येथे 88.77 मीटरच्या पहिल्याच प्रशंसनीय प्रयत्नात साध्य केली.
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याकरिता 85.50 मीटरचे अंतर पार करणे आवश्यक होते. ही पात्रता फेरी 1 जुलैपासून सुरू झाली आहे. 25 वर्षीय चोप्राची पात्रता फेरी काही मिनिटेच चालली. कारण त्याने पहिल्याच प्रयत्नात त्याच्या हंगामातील सर्वोत्तम अंतरावर भाला फेकला आणि ‘अ’ गटातील पात्रता फेरीत तो अव्वल ठरला. अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याकरिता 83 मीटरचे अंतर पार करणे आवश्यक होते. त्यामुळे 89.94 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी खात्यावर असलेल्या चोप्राने आणखी एकही भालाफेक न करता स्पर्धेचे मैदान सोडले.

चोप्राबरोबर त्याच गटात स्पर्धा करताना डी. पी. मनूने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात 81.31 मीटरच्या त्याच्या सर्वोत्तम भालाफेकीसह तिसरे स्थान पटकावले. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत त्याला स्थान मिळते की नाही हे पाहण्यासाठी आता ‘ब’ गट पात्रता फेरीची वाट पाहावी लागेल. आणखी एक भारतीय खेळाडू किशोर जेना ‘ब’ गटात भाग घेणार आहे. ‘अ’ आणि ‘ब’ गटातील 83 मीटरचे अंतर पार करणारे भालाफेकपटू किंवा अव्वल 12 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. पात्रता फेरीत स्पर्धकाकडून तीन प्रयत्न केले जातात.
जर्मनीचा ज्युलियन वेबरने 82.39 मीटरच्या त्याच्या सर्वोत्तम भालाफेकीसह दुसरे स्थान मिळविले. या मोसमात फॉर्मसाठी संघर्ष करावा लागलेला गतविजेता ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स 78.49 मीटरच्या भालाफेकीसह सातव्या स्थानावर, तर केनियाचा 2015 च्या जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता ज्युलियस येगो 78.42 मीटरसह आठव्या स्थानावर राहिला.
चोप्राची जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या शुक्रवारी झालेल्या पात्रता फेरीतील मोहीम 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमधील स्पर्धेच्या पात्रता फेरीतील कामगिरीची आठवण करून देणारी ठरली. त्याप्रसंगीही 86.65 मीटरची फक्त एक भालाफेक करून तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. त्यावेळी पात्रता अंतर 83.50 मीटरचे होते. त्यानंतर त्याने इतिहासात स्थान मिळविताना 87.58 मीटर अंतरावर भाला फेकून अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले होते.









