वृत्तसंस्था/ कोलंबो
पाकचा माजी वेगवान गोलंदाज अकिब जावेदची लंकन क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लंकन क्रिकेट मंडळाने ही घोषणा शनिवारी केली असून येत्या जूनमध्ये अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत लंकन क्रिकेट मंडळाने अकिब जावेदशी नुकताच करारा केला आहे.
अकिब जावेदचे मार्गदर्शन लंकन क्रिकेटपटूंना निश्चितच फायदेशीर ठरेल तसेच लंकेच्या गोलंदाजीचा दर्जा सुधारण्यास त्यांचा हातभार लागेल, असा विश्वास लंकन क्रिकेट मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष डिसिल्वा यांनी व्यक्त केला आहे. 51 वर्षीय अकिब जावेदने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 22 कसोटी आणि 163 वनडे सामन्यात पाकचे प्रतिनिधित्व करताना 236 बळी घेतले आहेत. वासिम अक्रम आणि वकार युनूस यांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अकिब जावेदची साथ त्यांना मोलाची ठरली होती. 2009 साली आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या पाक संघाचे अकिब जावेद प्रमुख गोलंदाज प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते.









