रत्नागिरीतील कोळंबे येथील घटना, पूर्णगड पोलीस स्थानकात नोंद
प्रतिनिधी/ रत्नागिरी
लग्नासाठी आलेल्या जावयाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे गावी घडली. अनंत अर्जुन तेरवणकर (52, रा. गोळप, तेरवणकरवाडी, रत्नागिरी) असे या मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेरवणकर हे रत्नागिरीतील कोळंबे येथे गुरुवारी आपल्या कुटुंबियांसह नातेवाईकाकडे लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर अनंत तेरवणकर कोळंबे येथे धरणात आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. ही बाब या धरणाजवळ कपडे धुवायला गेलेल्या महिलांच्या नजरेस पडली. त्या महिलांनी गावात धावपळ करून या घटनेची माहिती दिली. तत्काळ या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. दरम्यान पाण्यात बुडालेल्या अनंत तेरवणकर यांना पाण्याबाहेर मोठय़ा शर्थीने काढण्यात आले. लागोलाग त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या बाबत पूर्णगड पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरु होते. तेरवणकर हे गोळप येथे एका बागेत कामाला होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.









