आमदार विक्रम सावंत, माजी आमदार विलासराव जगताप करणार नेतृत्व
जत, प्रतिनिधी
जत तालुक्यात यंदा भीषण दुष्काळ असताना देखील शासनाने दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून जत तालुक्याला वगळल्याने तालुक्यातील सर्वपक्षीयांच्या वतीने शुक्रवार दि. 27 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार विक्रम सावंत व माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिली.
जत तालुक्यात यावर्षी सरासरी पेक्षाही अत्यल्प पाऊस झाला आहे. खरीप पाठोपाठ रब्बी हंगाम देखील पूर्णता वाया गेला आहे. पंचवीस गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, जनावरांच्या चाऱ्याची देखील भीषण टंचाई निर्माण झाली आहे. द्राक्ष, डाळिंब यासारखी बागायती पिके देखील शेतकऱ्यांच्या हातून निघून गेल्याने तालुक्यावर गंभीर परिस्थिती ओढवली आहे. साठवण तलाव कोरडे ठाक पडले आहेत. दीपावली नंतर पुन्हा तालुक्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून भूगर्भातील पाण्याची पातळी झपाटट्याने खालावत आहे.
एकीकडे अशी वास्तव परिस्थिती असताना सुद्धा प्रशासनाने चुकीचा अहवाल सादर केल्याने जतचा दुष्काळी यादीत समावेश होऊ शकला नाही. या पार्श्वभूमीवरच तालुक्यातील सर्व पक्षांचे नेते एकवटले असून जत तालुका 100% दुष्काळी जाहीर करण्यासाठी शुक्रवार दिनांक 27 रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी आ. विक्रम सावंत विलासराव जगताप, सुजय शिंदे,सरदार पाटील, रमेश पाटील, प्रमोद सावंत, संजय कांबळे, आप्पाराय बिराजदार, सुनील बागडे महादेव व्होनखंडे, संग्राम जगताप, विक्रम ढोणे, सागर पाटील, बसवराज चव्हाण, युवराज निकम, भूपेंद्र कांबळे, आकाश बनसोडे, सलीम पाचापुरे, रमेश माळी आदी उपस्थित होते.








